चुकीच्या उपचारांमुळे 13 वर्षीय मुलीचा गेला जीव?
डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे 13 वर्षांची लेक दगावली, असं म्हणत मुलीच्या आई-वडीलांनी टाहो फोडला आहे. डॉक्टरांनी लेकीवर चुकीचा उपचार केला म्हणून आमची 13 वर्षांची लेक गमवल्याचा आरोप या दाम्पत्याने केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 वर्षांची मुलगी आजारी पडली होती. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केलं. पण किरकोळ आजारी असणारी मुलगी, रुग्णालयातून घरी आलीच नाही. रुग्णालयातच तिचा जीव गेला आणि हा जीव तिच्या आजारामूळे नाही, तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेल्याचा तिच्या पालकांचा आरोप आहे.
काळीज पिळवटून टाकणारी ही घटना यवतमाळ येथे घडलीये. 13 वर्षांच्या मुलीला मानेवर गाठ आली. या गाठीमुळे तिची प्रकृती खालवली. तिच्या पालकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टर शैलेंद्र यादव यांनी मुलीवर उपचार केले. मानेवरची गाठ काढण्यासाठी डॉक्टरांनी पालकांना ऑपरेशनचा सल्ला दिला. वेळ ठरली, ऑपरेशन झालं, पण यात 13 वर्षांची लेक या मायबापाने गमावलीये.
अॅडमिट केलेल्या मुलीला डॉक्टरांनी भेटू दिलं नाही. तिची विचारपूसही आम्हाला करता आली नाही. म्हणून या मृत मुलीच्या आईने टाहो फोडला. एकुलती एक लेक एका चुकीच्या ऑपरेशनमुळे गमावली, म्हणून आईच्या आश्रूंचा बांध फुटला आणि आई वडिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं.
लेक गमावली.. पण, आम्हाला न्याय द्या.. चुकीचा उपचार केलेल्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी आता दाम्पत्याने केली आहे. पण या प्रकरणाची दुसरी बाजू अद्याप समोर आलेली नाही. रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अद्याप मौन बाळगण्यात आलंय. त्यामळे खरचं चुकीच्या उपचारांमुळे त्या मुलीचा जीव गेला का? की तिची प्रकृती खरचं गंभीर होती? याचा उलगडा अद्याप झाला नाही.
या प्रकरणानंतर जिल्हाधिकारी या प्रकरणाची शहानिशा करुन चौकशीचे आदेश देतील का? आरोपींवर तात्काळ कारवाई होईल का? यानिमित्ताने आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर होतील का? असे कितीतरी प्रश्न विचारले जात आहेत.