प्रणिती शिंदें: भारतीय जनता पक्षाने लोकांचा विश्वास घात केला

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची तयारी केली जात आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार यादीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच आज महाविकास आघाडीची पहिली पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेमध्ये बोलताना प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी भाजपवर टीका देखील केली.

लोकांना खोटं सांगून मतांचा वापर

प्रणिती शिंदे म्हणाल्या,आगामी लोकसभा निवडणूक ही लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक नसून लोकांमधून उभी राहिलेली चळवळ आहे. या निवडणुकीला चळवळीचे रूप आले आहे. कारण लोकांनी आता ही निवडणूक आपल्या ताब्यात घेतली आहे, असे चित्र आम्ही बाहेर फिरताना आम्हाला दिसून आले आहे. आज महाविकास आघाडी एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आली आहे. आज महाविकास आघाडी एकत्रित दहा वर्ष जो भारतीय जनता पक्षाने या देशाच्या लोकांवर जो अन्याय केला त्यांना जो त्रास दिला. लोकांना खोटं सांगून मतांचा वापर केला. मतदान केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने लोकांकडे पाठ फिरवली आहे म्हणून आम्ही लोकांच्या आणि लोकशाहीच्या सोबत उभे आहोत.

सत्ता असून उमेदवार बदलावे लागतात

सोलापूरच्या विषय गेले १० वर्षे ज्या लोकांनी दोन्ही खासदारांना मतदान केले हे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले असे म्हणाल्या हरकत नाही. खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने जनतेने भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान केलं. पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली. त्यामुळे त्यांना उमेदवार बदलावे लागले. सत्ता असूनसुद्धा, पंतप्रधान असूनही ही शोकांतिका आहे की ते सोलापूरसाठी काही करू शकले नाही. म्हणून २०१९ मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला. पुन्हा जनतेने मोठ्या मनाने मतदान केलं. २०१९ पर्यंत १५ लाख जमा झाले नाही. त्यांनी दिलेली अनेक वचन अपूर्ण राहिली. मात्र पुन्हा एकदा त्याचं लोकांचा वापर मतदान करून घेण्यासाठी २०१९ मध्ये खोटं सांगून करून घेतला. भारतीय जनता पक्षाने लोकांचा विश्वास घात केला आहे. २०२४ मध्ये त्यांच्याच पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. ही शोकांतिका आहे की सत्ता असून उमेदवार बदलावे लागतात. कारण त्यांनी काही काम केलं नाही.