पवन खेरा यांचा गडकरी यांच्यावर निशाणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एक लाख कोटींचे बॉण्ड बिना कॅबिनेट मंजुरीने काढण्यात आले. कॅगने भारतमाला परियोजना संदर्भात गैरप्रकारांवर बोट ठेवले. आमच्या वेळी कॅगचा अहवाल यायचा तेव्हा हेच लोक रस्त्यावर उतरत आंदोलन करायचे, संसदेत गदारोळ व्हायचा, मात्र आज कॅग रिपोर्टकडे दुर्लक्ष केले जात आहे. असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी सोमवारी (दि.१५) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आमच्या काळात चाळीस हजार कोटी रुपये असलेले राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कर्ज आज केवळ व्याज ३८ हजार कोटी रुपये झाले आहे. मात्र कुणावर ईडी, सीबीआय कारवाई केली जात नाही. द्वारका एक्सप्रेसवेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे.  निवडणूक रोखे संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.

आज केवळ कोण जिंकणार, हे महत्त्वाचे नसून महत्वाच्या फेजमधून देश जात आहे. लोकशाहीसाठी हा निर्णायक टप्पा आहे. संविधान वाचेल की, नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरही आता संविधान बदलू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणतात दुसरीकडे त्यांचेच नेते ४०० पार होताच संविधान बदलण्याची भाषा करत आहेत, यावरून देशात जनतेत संभ्रम आहे. मोदींच्या शब्दांवर जनतेचा विश्वास नाही, असा आरोप खेरा यांनी केला. मोदींच्या लाहोर प्रेमाविषयी बोलताना पाकिस्तान काँग्रेसच्या नावावे थरथर घाबरते, कारण त्यांना १९७१ ची आठवण ताजी होते, असा दावा करत पंतप्रधान मोदी यांनी एकदा तरी पत्रकार परिषद घ्यावी आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.