रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट
हैदराबाद : रोहित वेमुला मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास बंद केलाय. हैदराबाद उच्च न्यायालयात पोलिसांनी रोहितच्या मृत्यू प्रकरणी मोठा खुलासादेखील केलाय. रोहितला आपण दलित नसल्याची माहिती होती आणि त्याची खरी जात कळण्याच्या भीतीने त्याने आत्महत्या केली होती, असा दावा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास बंद करताना केलाय.
जानेवारी २०१६ मध्ये रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे विद्यापीठांमध्ये दलितांविरुद्ध होणाऱ्या भेदभावाविरोधात देशभरात निदर्शने झाली होती. हैदराबाद पोलिसांनी सध्याच्या प्रकरणात शुक्रवारी तेलंगणा उच्च न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. या रिपोर्टनुसार रोहित हा दलित नव्हता आणि त्याची खरी जातीय ओळख सर्वांना कळेल या भीतीने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटलंय.
क्लोजर रिपोर्टनुसार, सर्व आरोपींना क्लीन चिट देण्यात आलीय. सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, आमदार एन. रामचंदर राव आणि हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव यांच्याशिवाय केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय.