कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या Video

छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको परिसरातील काळा गणपती मंदिरासमोर गुरुवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने आलेल्या कारने (Car )दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जबर धडक दिली. या दुर्घटनेत दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या पायऱ्या चढत असलेल्या भाविकांवर अनियंत्रित कार(Car ) थेट घुसली. अपघात एवढा भीषण होता की कारने जवळपास पाच ते सहा जणांना अक्षरशः चिरडलं. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. हा संपूर्ण प्रकार मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. स्थानिक नागरिकांनी अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. काही वेळ मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित चालकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

पोलिसांकडून अपील
जो कोणी या घटनेचा साक्षीदार असेल किंवा अधिक माहिती असेल, त्याने नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मृत्यूमुखी पडलेले व जखमी भाविक कोण?
मृतांची आणि जखमींची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. नातेवाईकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

ही घटना अजूनही शहरवासीयांच्या मनात धक्का देणारी ठरत आहे. दरम्यान, अपघात टाळण्यासाठी मंदिर परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

हेही वाचा :