धोनीच्या चौकारानंतर चाहत्यांचा जल्लोष; ‘शॉर्टमीटर’ ने 128 डीबी रेकॉर्ड केले !

आयपीएलमध्ये (IPL 2024) रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 20 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतील आपले विजयाचे खाते उघडले. मात्र, पराभवानंतरही एमएस धोनीने चाहत्यांची मने जिंकली. यंदाच्या हंगामात प्रथमच फलंदाजीला मैदानात उतरलेल्या धोनीच्या एन्ट्रीवर आणि त्यानंतर त्याने ठोकलेल्या चौकार-षटकांरांवर चाहत्यांनी विक्रमी जल्लोष केला, ज्याच्या आवाजाने अक्षरश: कानठळ्या बसल्या.

नॉइज मीटरचा काटा किर्रर्र!

शिवम दुबे बाद झाल्यानंतर धोनी फलंदाजीला आला. तो येताच प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. धोनीच्या नावाचा जयघोष संपूर्ण स्टेडियममध्ये गुंजत राहिला. मुकेश कुमारच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून धोनीने आपला इरादा स्पष्ट केला. त्याने चेंडू सीमारेषेबाहेर पाठवताच प्रेक्षकांचा आवाज नॉइज मीटरवर 128 डेसिबलपर्यंत पोहोचला. हा एक विक्रम आहे. धोनी इथेच थांबला नाही आणि 17 व्या षटकात मुकेश कुमारला दोन चौकार मारून आपली शानदार खेळी सुरू ठेवली. शेवटच्या षटकात 2 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने 16 चेंडूत केलेल्या 37 धावांच्या नाबाद खेळीने माहीच्या चाहत्यांचे संपूर्ण पैसे वसूल झाले. (Dhoni Chants 128 Decibels)

सीएसकेच्‍या ‘थलायवा’साठी वय केवळ आकडेवारी..! धोनीचा ४२ व्‍या वर्षी नवा विक्रम

गेल्या वर्षी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल क्वालिफायर 1 मध्ये जेव्हा धोनी फलंदाजीसाठी आला तेव्हा तेथील चाहत्यांच्या जल्लोषाच्या आवाजाची पातळी 120 डेसीबल पर्यंत गेली होती. पण यंदाच्या हंगामातील 13 व्या सामन्यातच धोनीच्या चाहत्यांनी गेल्या वर्षीचा सर्वोच्च डेसीबलचा विक्रम मोडीत काढला. विशाखापट्टणमच्या मैदानावर 28,000 चाहत्यांनी धोनीच्या जयघोषा पातळी 128 डेसिबलच्या विक्रमी उच्चांकावर पोहचवली. (Dhoni Chants 128 Decibels)