दिल्ली विशेष न्यायालयाकडून आयसिसच्या पाच दहशतवाद्यांना शिक्षा

आयसिस संघटनेच्या दहशतवादी विचारधारेचा प्रचार आणि प्रसार तसेच देशभरात दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीतील पाच दहशतवाद्यांना दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने शिक्षा सुनावली. यात पुण्यातील एका तरुणीसह दोघांना शिक्षा सुनावली आहे. वेगवेगळ्या कलमांन्वये दोषी ठरवून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

पुण्यातील तरुणीसह काही आरोपी

सादिया अन्वर शेख (रा. विश्रांतवाडी, पुणे) नबील एस. खत्री (रा. कोंढवा, पुणे), अब्दूर बसित आणि जहानजेब सामी वाणी त्याची पत्नी हिना बशीर बेग (दोघे रा. ओखला विहार, जामियानगर) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.

आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार

चार वर्षांपुर्वी (मार्च २०२०) दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) जहानजेब वाणी आणि त्याची पत्नी हिना यांना अटक केली होती. आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार आणि देशविघातक कारवायांमध्ये दोघे सामील असल्याचे उघड झाले होते. आरोपी देशातील महत्वाच्या शहरात बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर याप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएन) सुरू केला.

सिरियात आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये डॉ. रहमान सामील

तपासातील माहितीनुसार दहशतवादी कारवायांत पुण्यातील सादिया अन्वर शेख, नबील एस. खत्री सामील असल्याचे समोर आल्यानंतर या दोघांना एनआयएच्या पथकाने पुण्यातून अटक केली. चौकशीत बंगळुरूतील डॉक्टर अब्दूर रहमान याचे नाव निष्पन्न झाले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयसिसच्या दहशवादी विचारधारेच्या प्रभावाखाली आलेला डॉ. रहमान डिसेंबर २०१३ मध्ये सिरियात गेल्याचे निष्पन्न झाले. सिरियात आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये डॉ. रहमान सामील झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात पाचजणांविरुद्ध एनआयएने २० मार्च २०२० रोजी दिल्लीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर पुरवणी आरोपपत्र १२ जानेवारी २०२१ रोजी दाखल करण्यात आले होते.

दिल्लीतील विशेष न्यायालयाने आरोपी जहानजेब सामीला याला विविध कलमांन्वये दोषी ठरवून २० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याची पत्नी हिना बेग हिला सात वर्षांची शिक्षा सुनावली. सादिया शेखला ७ वर्ष, तसेच नबील खत्रीला ८ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अब्दुर बसित याला शिक्षा सुनावण्यात आली. त्याने शिक्षेचा कालावधी न्यायलयीन  कैदेत पूर्ण केला आहे. बसितने आयसिसच्या दहशवादी विचारधारेचा प्रसार करण्यासाठी सामीला ‘व्हॉईस ऑफ हिंद’ हे मासिक सुरू करण्यासाठी मदत केली होती. या खटल्यात डॉ. रहमानविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, अद्याप त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.