सांगलीत काँग्रेस नेत्यांची तडकाफडकी पत्रकार परिषद
महाविकास आघाडीकडून सांगलीची जागा ठाकरे गटाला जाहीर करण्यात आली आहे. पण हा निर्णय आपल्याला पचनी पडणारा नाही, असं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केलं. विश्वजीत कदम यांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ता आणि जनतेची भावना समजून घ्यावी. सांगलीच्या जागेबाबात फेरविचार करावा, अशी विनंती विश्वजीत कदम यांनी केली.
“सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भावनेखातर आम्ही आज ही पत्रकार परिषद घेत आहोत. माझ्यासोबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते विशाल पाटील आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रम सावंत, काँग्रेस नेते ऋतुराज पाटील आणि इतर नेते उपस्थित आहेत. प्रथमत: आजची ही पत्रकार परिषद आम्ही जी जिल्हा काँग्रेस कमिटीतल्या असंख्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देवून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्ते आणि नागरिकांच्या विनंतीला मान देवून, लोकांच्या तीव्र भावनांची कदर करत आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत. आज आम्ही कुणाचेही प्रश्न घेणार आहोत. आम्ही फक्त आमच्या भावना मांडण्याचे प्रयत्न करत आहोत”, असं विश्वजीत कदम म्हणाले.
विश्वजीत कदम काय म्हणाले?
“प्रथमदर्शनी आपल्या सर्वांना माहिती आहे, गेल्या काही महिन्यांपासून आपल्या देशात आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याकरता आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहोत”, असं विश्वजीत कदम म्हणाले.
“गेल्या काही महिन्यांपासून देशातील सत्ताधारी पक्षांना जातीयवादी भाजप सरकारला, ज्यांनी सत्तेत असल्यापासून असंख्य चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. महागाई वाढवली आहे, महिलांवर अत्याचार वाढले आहेत, गुन्हेगारी वाढली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. बेरोजगारीमुळे तरुण पिढी अस्वस्थ झाली आहे. या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या गेल्या काही महिन्यांपासून जागावाटपावर चर्चा सुरु होत्या”, असं विश्वजीत कदम म्हणाले.
‘सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला’
“आपल्या सर्वांना माहिती आहे, जागावाटपाची चर्चा चालू झाल्यापासून काँग्रेस पक्ष सातत्याने आणि सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, सांगली जिल्ह्याचा इतिहास पाहता, सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले. आम्ही पक्षश्रेष्ठींना नागरिकांच्या भावना पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे”, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं.
“आम्ही राज्यातील प्रमुख नेते आणि दिल्लीतील प्रमुखांना सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भावना सांगितल्या आहेत. आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत होतो. काँग्रेस पक्ष सांगलीची जागा लढायला सक्षम आहे, ही भावना सातत्याने मांडली. कारण या सांगलीत काँग्रेसचे 2 आमदार आहेत. स्थानिक स्वाराज्य संस्थेत काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे आम्ही या जागेची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली”, अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी मांडली.
‘हा निर्णय एकतर्फी आणि पचनी न पडणारा’
“गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीत जागावाटपात ज्या घडामोडी घडल्या ते सर्वांना माहिती आहे. कोल्हापूरची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची होती म्हणून ही जागा काँग्रेसला देण्यात आली. या परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा दावा केला. या दाव्यातून त्यांनी 21 तारखेला अचानकपणे चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आमच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका घेतली. हा निर्णय एकतर्फी होता, त्यांनी इतर मित्रपक्षांना विश्वासात घेऊन हा निर्णय जाहीर करायला हवा होता”, अशी भावना विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली.
“उद्धव ठाकरे यांच्याबाबत आम्हाला व्यक्तीगत आदर आहे. ज्या संघर्षाच्या परिस्थितीतून आज महाराष्ट्रात राजकारण करत आहेत त्याबद्दल आदर आहे. सांगलीचा जो काही राजकीय इतिहास आहे, काँग्रेसच्या नेत्यांची भावना आहे ते समजून घेऊन महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेतला असता तर निश्चितपणे गेल्या 15 दिवसांत जी परिस्थिती निर्माण झाली ती झाली नसती”, अशी खंत कदम यांनी व्यक्त केली.
“महाविकास आघाडीकडून काल जागावाटप जाहीर करण्यात आली. सांगली जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय आहे, याची पुन्हा एकदा माहिती घ्यावी. सांगलीच्या जागेबाबत पुन्हा फेरविचार करावा, अशी आमची विनंती आहे. आमच्या भावना समजून घ्याव्यात. सांगली जिल्ह्याबाबतची बातमी आम्हाला सहजासहज पचनी पडली नाही. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत आम्ही सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न करु. यातून सकारात्मक मार्ग कसा निघेल? यासाठी प्रयत्न करु”, असं विश्वजीत कदम म्हणाले.