सांंगली हादरली! ‘खुनातील संशयिताचा खून’; कोयत्याने आठरा वार, वडिलांच्या हत्येचा घेतला बदला

सांगली : शहरात आज सकाळी पुन्हा एकदा खून(Murder ) का बदला खून या पद्धतीने थरारक घटना घडली. होलसेल भाजी विक्रेता महेश प्रकाश कांबळे (वय ४०) याचा कोयत्याने तब्बल १८ वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना आज (गुरुवारी) सकाळी सहाच्या सुमारास शंभरफुटी रस्त्यावरील दुचाकी शोरूमसमोर घडली.

जुन्या हत्येचा राग बनला कारण!

कांबळे याच्यावर २०२१ मध्ये त्याच्या सहकारी भाजी विक्रेत्या फिरोज ऊर्फ बडे शेख याच्या हत्येचा आरोप होता(Murder ). हा वाद पैसे व्यवहारातून निर्माण झाला होता. या प्रकरणात महेश कांबळेला अटक झाली होती, पण तो २०२३ मध्ये जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा आपला भाजीव्यवसाय सुरू केला होता. पण फिरोज शेख याचा मुलगा मुजाहिद शेख हा वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आसुसलेला होता.

सकाळच्या वेळेत एकट्याला गाठून थरारक हल्ला

आज सकाळी सहाच्या सुमारास महेश कांबळे हा आपली कार रस्त्याच्या कडेला थांबवून लघुशंकेसाठी उतरला होता. त्याच वेळी, पाळतीवर असलेला मुजाहिद शेख आणि त्याचा एक साथीदार तेथे दुचाकीवरून आले आणि महेशवर डोकं, कपाळ, पोट यावर कोयत्याने सपासप १८ वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलीस तपासात पुढील बाबी समोर

या घटनेनंतर शहर पोलिसांसह एलसीबीची दोन पथके संशयितांच्या शोधासाठी तातडीने रवाना झाली. कर्नाटकात छापेमारी सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

अनैतिक संबंधाचा देखील संशय

या हत्येमागे फक्त बदला नव्हे तर अनैतिक संबंधाच्या संशयाचाही धागा असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे हत्येचा उद्देश अधिक गुंतागुंतीचा असून पोलिस विविध कोनातून तपास करत आहेत.

संपूर्ण शहर हादरलं
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. भरवस्तीत सकाळच्या वेळेत अशा पद्धतीचा हल्ला होणे, ही शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं करते. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांकडून तत्काळ कडक कारवाईची मागणी होत आहे.

हेही वाचा :