संजय राऊतांच्या अडचणींत वाढ; PM मोदींचा एकेरी उल्लेख भोवला, गुन्हा दाखल

पंतप्रधान मोदींवर(Modi) वादग्रस्त वक्तव्य करणं संजय राऊतांना भोवलं आहे. त्यांच्यावर आठ दिवसांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानावर तब्बल आठ दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं नगरमधून समोर आलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत.

चौथ्या टप्प्यात नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. त्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वत: संजय राऊत मैदानात उतरले होते. नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी ८ मे रोजी अहमदनगरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती.

या सभेत बोलताना संजय राऊत यांनी औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी(Modi) यांचा जन्म एकाच गावात झाला होता, असा दावा केला होता. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलं तर तू कोण? असा पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख देखील संजय राऊत यांनी केला होता. त्या अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अतुल काजळे या पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात भादंवि कलम 171( क) 506 आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 123 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचाराच्या काळात राजकीय नेते एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करत असतात. परंतु संजय राऊतांनी मोदींवर केलेलं वक्तव्य काहीसं अंगलट आल्याची स्थिती दिसत आहे. आता राऊतांवर नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा :

 काँग्रेसचं 13 राज्यांत ‘एकटा जीव सदाशिव!’

अनिल कपूर पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून दिसणार, नायक सिनेमाचा सिक्वेल येणार

धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार