राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीतही साताऱ्याला स्थान नाहीच

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज (4 एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. दुसऱ्या यादीमध्ये दोन जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीमध्ये अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या भिवंडी जागेवर उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडीच्या जागेवरून तिन्ही पक्ष आमने-सामने आले होते. मात्र, ही जागा शरद पवार गटाला सुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी

दुसरीकडे सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या बीडमध्ये सुद्धा उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांच्या उमेदवारीची चर्चा आता समाप्त झाली आहे. ज्योती मिटे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्योती मेटे आता बीडमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरतात का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. 

सातारमधील उमेदवार घोषणा नाहीच

दरम्यान, आजच्या यादीमध्ये सातारा लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला जाईल, अशी चर्चा होती. मात्र, सातारा लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता सातारच्या जागेवरून गुंता वाढला आहे का? अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही जागा शरद पवार यांच्या वाट्याला जात असून माढामध्ये सुद्धा उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन जागांचा तिढा अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

उमेदवारीचा गुंता वाढला?

सातारमधून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक न लढण्याचे जाहीर केल्यानंतर उमेदवाराचा शोध सुरू आहे. मात्र, श्रीनिवास पाटील हे आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी अडून बसले आहेत. शरद पवार गटाकडून चार नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने आणि शशिकांत शिंदे यांना यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी नकार दिल्यानंतर आता शशिकांत शिंदे यांचे नाव समोर आलं आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या नावाची आज घोषणा होईल असं बोललं जात होतं. मात्र, शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा आज दुसऱ्या यादीमध्ये करण्यात आलेली नाही. 

तोपर्यंत उमेदवार द्यायचा नाही?

त्यामुळे जोपर्यंत भाजपचा उमेदवार घोषित होत नाही तोपर्यंत उमेदवार द्यायचा नाही? अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे महायुतीकडून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मगच राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी घोषित होणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे. ही स्थिती सातारमधील असताना शेजारच्याच माढा मतदारसंघांमध्ये सुद्धा शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. 

माढामधून धैर्यशील मोहिते पाटील रिंगणात?

माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची गुप्तपणे भेट घेऊन सव्वा तास केल्या चर्चा आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माढातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र निंबाळकर यांच्या उमेदवारी कडाडून विरोध सुरू आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील भाजपचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरच शरद पवार गटाकडून उमेदवारी घोषित केली जाणार का? याकडे लक्ष आहे.