सुनेत्रा पवारांबाबतच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण

बारामती लोकसभा मतदारसंघात मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार या मुद्द्यावरुन निर्माण झालेल्या वादाबाबत शरद पवार यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चांगलेच गाजत आहे. शरद पवार यांनी हे वक्तव्य करुन एकप्रकारे सुनेत्रा पवार या पवार घराण्याबाहेरुन आल्याचे सूचित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावरुन अजित पवार गटाने आक्रमक होत सून हीदेखील त्या घराण्याचाच भाग असते, असा प्रचार सुरु केला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सोमवारी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. 

शरद पवार यांनी म्हटले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला जो प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर मी बोललो. अजित पवार यांनी काय भाष्य केले होते, तुम्ही शरद पवारांना निवडून दिलंत, मला निवडून दिलं, ताईंना निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. त्यांच्या या वक्तव्यावर मी भाष्य केले होते. माझं म्हणणं फक्त अजित पवारांच्या त्या वक्तव्याबाबत मर्यादित होते. यापेक्षा मला काहीही वेगळे सांगायचे नव्हते, असे शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवारांच्या लेखी सून ही घराण्याचा भाग नसते, असा प्रचार अजित पवार गटाकडून केला जात आहे. त्यावर शरद पवार यांनी राजकीय कारकीर्दीत महिला हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचला. राज्यात महिला आरक्षणाचा निर्णय घेणारा पहिला मुख्यमंत्री मी होतो. शासकीय सेवेत महिलांना विशिष्ट आरक्षण देण्याचा मी घेतला. केंद्रात मी संरक्षणमंत्री असताना मुलींना सैन्यदलात घेण्याचा निर्णयही मी घेतला. त्यामुळे आमच्या लोकांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे, हे स्पष्ट होते, असे शरद पवार यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाचा परिणाम लोकसभा निवडणुकीत जाणवेल का? शरद पवार म्हणाले…

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का, याबाबत ठोसपणे बोलण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले की, मी मराठवाड्यात गेलो होतो, तेथील लोकांच्या मनात राग आहे. या लोकांना मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आस्था आहे. पण या आस्थेचे मतांमध्ये किती रुपांतर होईल, हे माहिती नाही. मी जरांगे-पाटील यांना फार ओळखत नाही. मी त्यांना उपोषणाच्या सुरुवातीला त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी एकदाच भेटलो होतो, असे शरद पवार यांनी सांगितले.