विधानसभा निवडणुकीनिमित्त शेअर बाजार बंद, कुठल्या व्यवहारांना सुट्टी?
मुंबई : शेअर मार्केटमध्ये(Stock market) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात बाजारातील व्यवहार एक दिवस बंद राहणार होते तर आता आणखी एक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुधवार, २० नोव्हेंबर रोजी शेअर मार्केटमध्ये सुट्टी असेल आणि कोणतेही कामकाज होणार नाही. या दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे त्यामुळे, बाजारात खरेदी-विक्री बंद ठेवण्यात येईल.
बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर मार्केट(Stock market) एक्सचेंजवर शेअर बाजारात सुट्टी असेल आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे या दिवशी एक्सचेंजमध्ये कोणतेही काम होणार नाही. तसेच चलन बाजार आणि कमोडिटी एक्स्चेंजवर व्यापारासाठीही बंद राहील. याशिवाय महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेच्या निवडणुकाही त्याच दिवशी होणार असून उत्तर प्रदेशच्या नऊ विधानसभा पोटनिवडणुका पार पडणार आहेत.
मात्र, देशाची आर्थिक राजधानी मुंबई जिथून स्टॉक एक्सचेंजचे कामकाज चालते तेथे निवडणुकीचा दिवस असल्याने शेअर बाजारात सुट्टी देण्यात आली आहे. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राजकीय हालचाली होतील ज्यासाठी सर्व मुंबईकर आणि महाराष्ट्रातील रहिवाशांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आर्थिक कामाला एक दिवसासाठी विराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
एनएसईवर एक्सचेंजने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या बुधवार, २० नोव्हेंबर रोजी व्यापार सुट्टी ठेवली जाईल.’
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. कार्यक्रमानुसार २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील मतदार एकाच टप्प्यात मतदानाचा हक्क बजावतील तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर जातील. महाराष्ट्र विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत असून यावेळी राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेस आणि महायुती आघाडी, ज्यात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र आहेत.
नोव्हेंबरमध्ये एकूण १२ दिवस शेअर बाजार बंद राहणार असून यामध्ये सण आणि विशेष सुट्ट्यांचा समावेश असणार आहे. दिवाळीनिमित्त शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी शेअर बाजाराला सुट्टी होती त्यानंतर, गुरु नानक जयंतीनिमित्त शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी बाजारात सुट्टी असेल तर बुधवार, २० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहे. याशिवाय नोव्हेंबरमध्ये महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवारसह एकूण १२ दिवस शेअर बाजारात कोणतेही कामकाज होणार नाही.
हेही वाचा :
राज ठाकरे एकदा मुख्यमंत्री व्हाच! झळकले बॅनर
नोव्हेंबर महिना ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा; शनीदेव करणार मालामाल
काेल्हापूर जिल्ह्यात मोठ्या घडामाेडी; राजू शेट्टींचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा