हातातोंडाशी आलेला घास हिरावला

बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गुरूवारी (11 एप्रिल 2024) रोजी दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसहीत सर्वांचीच तारांबळ उडाली. दोन तास धुवांधार पडलेल्या पावसामुळे उभे पिक आडवे झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत पुर्णपणे भिगडले आहे. बीड जिल्ह्यातील डोंगरपट्यातील फळबागा उदध्वस्त झाल्या आहेत.

ढगांचा गडगडाट, वादळी वारा आणि पावसाने दोन तास धुवांधार बॅटींग केल्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वडवणी, धारूर, बीड, अंबाजोगाई, परळी, केज या या भागांमध्ये काही ठिकाणी हलक्याशा सरी पडल्या तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

दोन वाजेपर्यंत कडक ऊन पडले होते. मात्र अवघ्या काही तासाभरात निसर्गाचे रौद्ररुप पाहण्यास मिळाले. विशेष करून बालाघाटच्या डोंगरपट्ट्यात अवकाळी पावसाने चांगलाच कहर केला. वडवणी आणि धारूर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले तर चिंचवण, सोन्नाखोटा, दुनकपाडा, पहाडी पारगाव, चोरंबा या भागांमध्ये पावसासह गारपिटीचा तडाखा बसला.त्यामुळे उन्हाळी बाजरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरी लावण्यात येत असल्यामुळे या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वारा आणि गारांमुळे आंब्याचा सडा पडला तसेच मोठ्या प्रमाणता झाडे कोसळली आहेत.

आंब्यासह मोसंबी, डाळिंब आणि सिताफळ या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप, रब्बी हंगामामुळे आधिच अडचणीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणाऱ्या फळबागाही उध्वस्त झाल्या आहेत. विशेषत: केशर आंब्याच्या बागा प्रामुख्याने डोंगरपट्ट्यात बहरल्या होत्या त्या आज झालेल्या पावसामुळे उध्दवस्त झाल्या आहे.