बीड जिल्ह्यात भर उन्हाळ्यात नदी-नाल्यांना पूर; वादळी वाऱ्यासह गारपीट.

दुष्काळी बीड जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला आहे. संपूर्ण बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या या जिल्ह्यात भर उन्हाळ्यात पूर आला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहात असून शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. वडवणी, धारूर, माजलगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे.

जवळपास एक ते दीड तास झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने ओढे, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर यामुळं शेतकऱ्यांच्या फळबागांसह पिकांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान अगोदरच दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांपुढं आता अवकाळी पावसाने नवसंकट उभा केले आहे. हातातोंडाशी आलेला आंबा पीक आता नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. तर कांद्याच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे.त्यामुळे फळबागांसह नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.