हिंदू संस्कृतीतील आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या(Deep Amavasya) हा एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी आणि घरातील अंध:कार नष्ट करण्यासाठी दिव्यांचे पूजन करण्याची परंपरा या दिवशी पाळली जाते. यंदाची दीप अमावस्या गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे, पणत्या, समया आणि निरांजन यांची स्वच्छता करून त्यांचे विधीवत पूजन केले जाते.
दीपपूजनाचा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व :
दिवा म्हणजे प्रकाश, शुद्धता आणि आत्मिक ऊर्जा यांचं प्रतीक. दीप अमावस्येच्या दिवशी दीप पूजन करून जीवनातील अज्ञान, संकटे आणि नकारात्मक शक्ती दूर करण्याचा संकल्प केला जातो. दिव्याच्या उजेडामुळे सकारात्मकता वाढते, घरात शांतता आणि समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. तसेच याच दिवशी पितृ तर्पण करण्याची परंपराही काही ठिकाणी पाळली जाते, जेणेकरून पूर्वजांचा आशीर्वाद लाभावा.
शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि नैवेद्य :
दीप अमावस्या तिथी सुरू: २४ जुलै २०२५, गुरुवार सकाळी ७:२८
तिथी समाप्त: २५ जुलै २०२५, शुक्रवार सकाळी ९:१७
अमृत काळ: २४ जुलै रोजी दुपारी १:३० ते ३:००
या दिवशी घर स्वच्छ करून, तुळशीपुढे, देवघरात व प्रवेशद्वाराजवळ मातीचे किंवा धातूचे दिवे तूप किंवा तेल घालून प्रज्वलित करावेत. गोड नैवेद्य (कणकेचे किंवा बाजरीचे दिवे, पिठल-भात, गोड पिठाचे पदार्थ) अर्पण करून चातुर्मासातील कथा वाचन आणि शुभ मंत्रांचे पठण करावे. पूजेनंतर “दीपज्योती नमोस्तुते” सारख्या प्रार्थना म्हणाव्यात.
दीप अमावस्येची कथा आणि भक्तीभाव :
दीप अमावस्येशी(Deep Amavasya)निगडित एक जुनी कथा सांगितली जाते. एका राणीने दिव्याची पूजा बंद केल्यामुळे तिच्यावर खोटे आरोप झाले. पण दिव्यांच्या कृपेने तिची निर्दोषता सिद्ध झाली आणि तिचा सन्मान पुन्हा बहाल झाला. या कथेतून दीपपूजनामुळे संकटांपासून सुटका होते हा संदेश मिळतो. म्हणूनच ही परंपरा श्रद्धेने आजही जपली जाते.
अलीकडे काही जण दीप अमावस्येला “गटारी अमावस्या” म्हणत मांसाहार, मद्यपान आणि पार्टी करतात, पण ही पूर्णपणे चुकीची समजूत आहे. गटारी म्हणजे “कष्टहारी” – आषाढात कष्ट केलेल्या शेतकऱ्यांचा विश्रांतीचा दिवस. दीपपूजनाच्या निमित्ताने पावसाळ्यातील अंध:कार दूर करून श्रावणाचं स्वागत केलं जातं. त्यामुळे धार्मिक शुद्धतेचा आणि आध्यात्मिक जागृतीचा हा दिवस आहे.
हेही वाचा :