हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!

एकीकडे राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठले असताना, दुसरीकडे विदर्भात मात्र पुन्हा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट, विजांच्या कडकडाट 30-40 प्रतितास सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला आहे. तर पुढील दोन दिवस विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. तर कुठे अनेकांना यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने संकटाचे ढग आणखी गडत होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता शेतकऱ्यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सुचनाही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

पुढील पाच दिवस विदर्भात अवकाळी पावसाचे ढग
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी काल दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. तर या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय. अशातच पुढील 48 तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना नागपूर प्रदेशीक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर आज 8 मे ते 12 मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, विजांच्या कडकडाटास 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज 8 मे रोजी विदर्भातील गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ,अकोला हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, येथे गारपीट, अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटास 40-50 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर हीच परिस्थिती 9 मे ला देखील कायम राहणार आहे.

ऐन उन्हाळ्यात पावसाळा
एकीकडे राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असताना, दुसरीकडे मात्र पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने, ऐन उन्हाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळतो आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात मंगळवारला सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांसह, पालेभाजी पिकांनाही मोठ्या प्रमाणात याचा फटका बसलेला आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्यांची आहे.