भाजप आमदाराला गावकऱ्यांच्या विरोध; साहेब आल्या पावली परतले

एकीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा घोषित करण्यात आला, मात्र दुसरीकडे नांदेडच्या एका गावात भाजप आमदाराला गावकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतर आल्या पावली परत जावे लागले. यापूर्वी मागील पाच वर्षात तुम्ही गावात कधी अलात का? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित करत आमदार साहेबांवर प्रश्नांची सरबत्ती केली. या घटनेचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. 

भाजपाचे आमदार राजेश पवार हे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नायगाव मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत. नायगाव मधील गोदमगाव या गावात राजेश पवार प्रचारासाठी गेले असता, गेल्या पाच वर्षात तुम्ही गावाला कितीदा भेट दिली?, असा सवाल करत गावकऱ्यांनी प्रश्न विचारले. आमदार राजेश पवार चर्चेला तयार झालेले असतानाही गावकऱ्यांनी मात्र विरोध दर्शवत कोणतीही चर्चा केली नाही. गावकऱ्यांच्या नाराजीमुळे आमदार राजेश पवार यांना आल्या पावली गावातून परत जावे लागले. 

नेमकं काय घडलं? 

नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारार्थ महायुतीचे सर्वच आमदार, नेतेमंडळी मतदारसंघ पिंजून काढत असून, गावागावात जाऊन भेठीगाठी घेत प्रचार करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पवार देखील आपल्या मतदारसंघात चिखलीकर यांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या गावात जाऊन गावकऱ्यांच्या भेटी घेतायत. अशात ते नायगाव मधील गोदमगाव येथे पोहचले. मात्र, गावात आलेल्या पवार यांना गावकऱ्यांनी थेट विरोध केला. काही तरुणांनी त्यांना थेट प्रश्न विचारत पाच वर्षात गावात तुम्ही कितीवेळा आलेत असा प्रश्न विचारला. गावातील अनेक विकास कामांसाठी मागणी करूनही त्याला मान्यता मिळत नसल्याचे म्हणत गावकऱ्यांनी पवार यांच्यासोमर आपले प्रश्न मांडले. पवार यांच्या समर्थकांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला, पण गावकरी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहता आमदार पवार गावातून निघून गेले. 

नेत्यांना ग्रामीण भागात विरोध? 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ग्रामीण भागात जाणाऱ्या नेत्यांना अनेक ठिकाणी विरोध होतांना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि गावातील विकास कामांच्या मागणीसाठी नागरिक प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांना विरोध करतायत. यापूर्वी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नींना देखील विरोध करण्यात आला होता. तर काही गावांनी थेट निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.