नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास का करतात? जाणून घ्या यामागची कथा

श्रावण महिना म्हटलं की धार्मिक सणांची रेलचेल असते. त्यात नागपंचमीला(Nag Panchami) विशेष स्थान आहे. यंदा नागपंचमीचा सण 29 जुलै रोजी साजरा केला जाणार असून याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी अनेक महिला आपल्या भावासाठी उपवास करतात. पण अनेकांना यामागचं कारण माहीत नसतं. नागपंचमीच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी भावासाठी उपवास करण्यामागे एक भावस्पर्शी पौराणिक कथा दडलेली आहे. चला जाणून घेऊयात ती कथा नक्की काय आहे.

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी(Nag Panchami) साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा करून शेतातील पिकांचं, समृद्धीचं आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचं आशीर्वाद मागितले जातात. भगवान शंकराच्या गळ्यात वसलेला नाग आणि विष्णूंचा शेषनाग म्हणून नागाचं हिंदू धर्मात महत्त्व आहे. या दिवशी पूजा केल्याने कालसर्प दोष दूर होतो आणि सर्पदंशाची भीतीही कमी होते.

पौराणिक कथेप्रमाणे सत्येश्वरी नावाची एक कन्या होती. तिचा भाऊ सत्येश्वर हा तिला अत्यंत प्रिय होता. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वरचा अचानक मृत्यू होतो. भावाच्या निधनाने व्याकुळ झालेल्या सत्येश्वरीने अन्न-पाणी सोडलं. तिच्या दु:खात ती गढून गेली असताना, तिला एक नाग दिसतो. तो नाग तिला तिच्या भावाच्याच रूपात आला असा जाणवते. पुढे भावाच्या रूपात आलेल्या नागाला तिनं आपला भाऊ मानलं आणि त्याचं पूजन केलं.

सत्येश्वरीच्या या निस्सीम भावप्रेमाने नागदेवता प्रसन्न झाली आणि तिला वरदान दिलं की, “जी स्त्री मला आपला भाऊ मानून पूजन करेल, तिचं आणि तिच्या भावाचं मी नेहमी रक्षण करीन.” तेव्हापासून महिलांनी नागपंचमीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी नागदेवताचं पूजन करून भावासाठी उपवास करायला सुरुवात केली.

2025 चा नाग पंचमीचा(Nag Panchami) सण मंगळवार, 29 जुलै रोजी साजरा केला जाईल. श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 28 जुलै रोजी रात्री 11.24 वाजता सुरू होईल आणि 30 जुलै रोजी दुपारी 12.46 वाजता संपेल.

भावासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या सत्येश्वरीच्या कथेमुळे नागपंचमी केवळ धार्मिक नव्हे तर भावनिकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते. उपवास, पूजा आणि प्रेमाच्या या परंपरेतून बहीण-भावाच्या नात्याची सुंदर भावना व्यक्त करता येते.

हेही वाचा :