अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने वाढलं शिंदे गटाचं टेन्शन?
नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा अजून कायम असल्याचं अजित पवार गटाचे प्रवक्ते अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. उमेदवारी जाहीर होण्यास उशीर होत असल्याने छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी छगन भुजबळ हे तुल्यबळ उमेदवार आहेत, असं माध्यमांशी संवाद साधताना अनिल पाटील म्हणाले. ते म्हणाले आहेत की, ”नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षाचा आग्रह होता. मात्र निर्णय घेण्यास विलंब लागत असल्यामुळे उमेदवाराला दिशा, ही फार चांगली देता येत नाही, म्हणून त्यांनी (छगन भुजबळ) माघार घेतली. मात्र याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिकचा दावा सोडला आहे, असं अजिबात नाही.”
भावना गवळी यांच्यासारखी गोडसे यांच्यावर येणार नाही: अब्दुल सत्तार
उमेदवारी मिळवण्यासाठी हेमंत गोडसे मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. मात्र अद्याप देखील नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही, मात्र शिवसेनेचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकमध्ये लोकसभेची उमेदवारी हेमंत गोडसे यांनाच मिळणार, असा दावा केला आहे. म्हणाले आहेत की, हेमंत गोडसे हेच नाशिकमधून उमेदवार असतील.
नाशिकमध्ये अखिल भारतीय समता परिषदेची तातडीची बैठक
यातच छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर समता परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये अखिल भारतीय समता परिषदेची तातडीची बैठक बोलावली. मंगळवारी सकाळी ११ वाजता छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी भुजबळ फॉर्मवर समता परिषदेची तातडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला समता परिषदेसह अन्य ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच भुजबळ यांनी निवडणूक लढवावीही मागणी त्यांच्याद्वारे केली जाणार आहे.
नाशिक लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी देखील रिंगणात
दरम्यान, नाशिक लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी देखील रिंगणात उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून नाशिकसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर यांना वंचित आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.