हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील मानेंचा पत्ता कट?
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून एकनाथ शिंदेंच्या सहा खासदारांचा पत्ता कट होण्याची चर्चा आहे. हिंगोलीमध्ये हेमंत पाटील आणि हातकणंगल्यामधून धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपचा विरोध लक्षात घेता हे दोन्ही उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदेंवर येणार असल्याची माहिती आहे. त्यातच आता धैर्यशील मानेंच्या ठिकाणी त्यांच्या आई माजी खासदार निवेदिता माने यांची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं समोर येतंय.
शिवसेना शिंदे गटाकडून राज्यातल्या आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांच्या नावाचा समावेश होता. या दोन्ही नावांना भाजपचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणचे उमेदवार मागे घेण्यात येणार असून त्या ठिकाणी नवीन चेहरे देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
निवेदिता माने निवडणूक लढवणार?
धैर्यशील माने यांची उमेदवारी मागे घेऊन त्या ठिकाणी माजी खासदार निवेदिता माने यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली शिंदे गटात सुरू असल्याची माहिती आहे. निवेदिता मानेंनीही त्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. निवेदिता माने या धैर्यशील माने यांच्या आई असून त्यांनी या आधी दोन वेळा हातकणंगले मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे.
या आधी अस्तित्वात असलेल्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून निवेदिता माने या 1999 आणि 2004 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार होत्या. त्यानंतर 2009 साली राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 सालीही राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी, धैर्यशील माने यांनी त्यांच्या आई, निवेदिता माने यांच्या पराभवाचे उट्टे काढत राजू शेट्टी यांचा पराभव केला होता.
शिवसेनेच्या फुटीनंतर धैर्यशील माने यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीपासूनच या मतदारसंघातील उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपकडून सातत्याने केली जात होती. धैर्यशील माने यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी असल्याचं सांगत भाजपने त्यांच्या नावाला विरोध केला होता.
भाजपचा विरोध असला तरी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धैर्यशील माने यांनाच संधी दिली. पण आता त्यांची उमेदवारी मागे घ्यावी लागते की काय अशी परिस्थिती आहे. कोणत्याही स्थितीत हातकणंगल्याचा उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर उमेदवारी बदलण्य़ासाठी मोठा दबाव आहे.