पुणे महापालिकेकडून उघड्यावर कचरा टाकणाऱ्या १६ हजार नागरिकांवर कारवाई
पुणे : स्वच्छ शहर सुंदर शहर हि संकल्पना रान्याभरात राबविण्यात येत आहे. परंतु अनेक नागरिक हे उघड्यावरच कचरा (Pune) टाकून घाण करत असतात. अशा नागरिकांवर महापालिकेची नजर असून गेल्या साडेतीन महिन्यात १६ हजार नागरिकांवर महापालिकेने कारवाई केली आहे. तरीही शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले नसल्याने हे कचरा टाकणारे सुधारण्याऐवजी शिरजोर होत असल्याचे चित्र आहे.
पुणे शहराची हद्दवाढ झाल्यानंतर शहराचे एकूण क्षेत्रफळ ५४३ चौरस किलोमीटर इतके झाले आहे. पुणे शहरात रोज २१०० ते २२०० टन कचरा निर्माण होत आहे. तसेच शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते झाडणे, कचरा उचलणे यासाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत. शहरात उघड्यावर कचरा टाकणारे सुमारे ९०० ठिकाणे होते. त्याठिकाणी उपाययोजना करून प्रशासनाने ही संख्या ६०० पर्यंत खाली आणली आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यात थांबून नागरिकांना उघड्यावर कचरा टाकताना मज्जाव करत आहेत.
६६ लाखांचा दंड वसूल
तरी देखील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण मोठे आहे. महापालिकेकडून मनाई असताना देखील नागरिकांकडून त्याचे पालन केले जात नाही. यामुळे महापालिके आता कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार मागील साडेतीन महिन्यात १६ हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ६६ लाख ३४ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल केला आहे.