सूर्य कोपला! उष्माघातामुळे राज्यात ३ जणांचा मृत्यू, ३० वर्षाच्या तरूणाचा बस स्थानकावर गेला जीव

महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून सकाळी सात वाजल्यापासूनच (temperature) कडाक्याचे ऊन जाणवत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून अकोला, हिंगोली आणि वाशिम येथे तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हिंगोली शहरातील बस स्थानक परिसरात ३० वर्षीय शेख रफिक शेख उस्मान यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात सकाळपासूनच तापमान झपाट्याने वाढत असून दुपारपर्यंत पारा ४० अंशांपर्यंत पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील अनसिंग परिसरात ४५ वर्षीय केशव गाढे यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह काही दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. अकोला, नंदुरबारसह काही जिल्ह्यांमध्ये देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. सकाळपासूनच तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना दैनंदिन कामांमध्ये अडचणी येत आहेत आणि उष्णतेशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एक मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत राज्यात उष्माघाताचे १७ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून इतर काही जिल्ह्यांतही रुग्ण आढळले आहेत. परिस्थिती लक्षात घेता पुढील तीन दिवस अतिउष्णतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक नसल्यास दुपारी बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा

लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार

इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक