सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील विहाळ गावात (shocking incident) घडलेल्या एका अत्यंत संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या ८२ वर्षीय जनाबाई भगवान सुरवसे यांची त्यांच्या स्वतःच्या नातीनेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे या प्रकरणातील सत्य समोर आले.

जनाबाई सुरवसे या गेल्या काही काळापासून अंथरुणाला खिळल्या होत्या. आजारामुळे त्यांना सतत वेदना होत असल्याने त्या वारंवार मदतीसाठी हाक मारत असत. याच कारणावरून ११ एप्रिलच्या रात्री त्यांच्या नाती मनिषा रविंद्र लवंगारे हिच्यासोबत त्यांचा वाद झाला. रागाच्या भरात मनिषाने आजीला शिवीगाळ करत अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर तिने जनाबाई यांचे डोके भिंतीवरील दगडावर आपटले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवाल आणि प्रत्यक्ष परिस्थितीत विसंगती आढळल्याने पोलिसांना संशय आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सखोल तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीची कसून चौकशी केली असता ती गोंधळली आणि अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली.
या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात मनिषा लवंगारे हिच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुखापत पोहोचवणे आणि अपमानास्पद वर्तनासंदर्भातील कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार
इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय