संविधान बदलायचंय म्हणणाऱ्या खासदाराचं भाजपने तिकीट कापलं
देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पंतप्रधानांसह दिग्गज नेते, मंत्री आणि पदाधिकारीही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत देशातील संविधानाच्या मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर संविधान बदलतील, असा आरोप विरोधी पक्षाकडून, इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. काहीही झालं तरी संविधान बदललं जाणार नाही, स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी संविधान बदललं जाणार नाही, असेही मोदींनी म्हटले आहे. त्यामुळे, संविधान हा मुद्दा यंदाच्या राजकारणात सर्वात अग्रस्थानी दिसून येत आहे. कर्नाटकमधील भाजपा खासदाराने केलेल्या विधानामुळेच हे वातावरण पेटलं आहे. मात्र, भाजपाने आता या खासदार महाशयांचं तिकीट कापलं आहे.
भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी संविधान बदलाची भाषा केली होती. अब की बार, 400 पार या घोषणेचा संदर्भ देत त्यांनी हे विधान केलं होतं. मात्र, भाजपाने त्यांचं हे विधान गांभीर्याने घेतलं असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. विशेष म्हणजे गतनिवडणुकीत त्यांनी तब्बल 4 लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेतलं होतं. तरीही, भाजापने यंदा त्यांना उमेदवारी नाकारली आहे. बेळगाव कर्नाटकातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या कारवारमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. भाजपने या मतदारसंघात सहावेळा विजय नोंदविला. मात्र भारतीय संविधान बदलण्यासाठी भाजपने ‘चारसो पार’चा नारा दिला आहे, असे वक्तव्य करणारे अनंतकुमार हेगडे यांनाच बदलून टाकण्यात आले.
खासदार अनंतकुमार हेगडे यांनी गत 2019 च्या निवडणुकीत तब्बल 68 टक्के मतदान घेतले होते. मात्र, यंदा हेगडेंचे तिकीट कापून भाजपने सिरसी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसनेही याच मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक हरणाऱ्या डॉ. अंजली निंबाळकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, यंदा या मतदारसंघात चूरस चांगलीच निर्माण झाली आहे. कारवार आणि बेळगाव जिल्ह्यातील आठ मतदारसंघात हा लोकसभेचा मतदार संघ पसरला आहे.
गत 2019 मधील मतदारांची आकडेवारी
सन 2019 मध्ये कारवार लोकसभा मतदारसंघात अनंतकुमार हेगडे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. हगडे यांना तब्बल 7,86,042 मतं मिळाली होती. तर, विरोधी काँग्रेसचे उमेदवार आनंद आस्नोतीकर यांना 3,06,393 मते मिळाली होती. म्हणजेच, अनंतकुमार हेगडे यांना तब्बल 4 लाखांहून अधिक मताधिक्य होतं. तरीही, भाजपाने यंदा त्यांची उमेदवारी कापली आहे.