काँग्रेसला राम मंदिराच्या जागी पुन्हा मशीद बांधायचीय; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर अयोध्येतील राम मंदिराच्या(ram mandir) जागी बाबरी मशीद बांधली जाऊ शकते, असं खळबळजनक विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलं आहे. बाबरी मस्जिदीची पुनर्बांधणी थांबवण्यासाठी भाजपच्या ४०० हून अधिक जागा जिंकून द्या, असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं आहे.

ओडिसाच्या मलकानगिरी येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना हिमंता बिस्वा सरमा यांनी हे विधान केलंय. त्यांच्या या विधानाने मोठा वाद होण्याची शक्यता आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आता राजकीय पक्षांनी चौथ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे.

यावेळीही राम मंदिर(ram mandir) हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा राहिला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. ओडिसा येथील रॅलीला संबोधित करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, “लोक आम्हाला विचारतात की आम्हाला ४०० जागा का हव्या आहेत?”

“कारण काँग्रेस राम मंदिराऐवजी बाबरी मशीदीची पुनर्बांधणी करू शकते. मात्र, बाबरी मशीद भारतात पुन्हा कधीही बांधली जाणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी एनडीएला ४०० हून अधिक जागांवर विजयी करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे”.

“पूर्वी काँग्रेसचे लोक आम्हाला विचारायचे की राम मंदिर कधी बांधणार? त्याची तारीख सांगा. आता काँग्रेसवाले हे प्रश्न विचारत नाहीत. कारण आम्ही राम मंदिरही बांधले आहे. मोदींनी दिलेल्या हमीचा हा परिणाम आहे. आता लाखो लोक राम मंदिराला भेट देत आहेत”.

“आमचे सरकार एखादी गोष्ट फक्त बोलून दाखवत नाही, तर ती पूर्णही करते. काँग्रेसला हे कळून चुकले आहे. केवळ राम मंदिरापर्यंत आम्ही थांबणार नाही. देशातील प्रत्येक मंदिर मुक्त करायचे आहे. आमचा अजेंडा मोठा आहे आणि आम्हाला पुढे जायचे आहे”, असंही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

हेही वाचा :

द्रविडनंतर टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा कोच

अरविंद केजरीवाल यांना दिलासा! ऐन निवडणुकीत न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन

काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये यावं; भरसभेतून PM मोदींची शरद पवार आणि ठाकरेंना ऑफर