पाणीटंचाई मुळे महिलांचा सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा

 उत्तमनगर भागातील शुभमपार्क येथील पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महिलांनी महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढत धरणे आंदोलन केले. त्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून शुभमपार्क परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अद्यापही समस्या कायम आहे. परिणामी, महिला कॉंग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षा वंदना पाटील यांच्या नेतृत्वाखाली लिना विश्वंभर, किशोरी पवार, सोनल पाटील, स्वाती देसाईंसह शेकडो महिलांनी मनपा सिडको विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढत मागण्यांचे निवेदन दिले.

२०१८ पासून शुभमपार्क व परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास होत आहे. पाच वर्षांपूर्वी आमच्या भागातील पाण्याची पाइपलाइन कामटवाडे भागाकडे वळविल्याचे समोर येत आहे. आमच्याकडे नवीन जलवाहिनी टाकण्यात आल्याने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तसेच पवननगर येथील पाण्याची टाकी जुनी झाल्याने त्यात क्षमतेपेक्षा कमी साठा केला जातो.या जलकुंभाचीही तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी आंदोलक महिलांनी केली. महापालिकेने शुभमपार्क परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.