चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; दिग्गज नेत्यांच्या सभांनी धुरळा उडणार

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफ आज थंडावणार(active campaign) आहेत. शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते राज्यात वादळी सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठिकठिकाणी सभा होणार आहेत. दोन्ही नेते एकमेकांवर नेमकी काय टीका करतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

काँग्रेस(active campaign) नेत्या प्रियंका गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याही आज राज्यात सभा होणार आहे. दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे आज महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे.

यामध्ये पुणे, शिरूर, मावळ, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, शिर्डी आणि बीड मतदारसंघांचा समावेश आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवार आपली सर्व ताकद पणाला लावून प्रचार करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता प्रचारांच्या तोफा थंडावणार आहेत.

शेवटच्या दिवशी राज्यात प्रचारसभांचा धडाका

 • महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पालघर येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
 • काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज नंदुरबारमध्ये जाहीर सभा घेणार.
 • मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी ९ वाजता रोड शो करणार आहेत. यानंतर त्यांची सभा होणार आहे.
 • अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार, आदित्य ठाकरे, यांची हडपसर येथे जाहीर सभा होणार आहे.
 • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे पुण्यातील कोथरूड येथे सकाळी ११ वाजता रॅली काढणार आहे.
 • मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी १०.३० वाजता पुण्यात सभा घेतील. देवेंद्र फडणवीस पुण्यात तळ ठोकून आहेत.
 • नाशिक लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते संजय राऊत नाशिक मध्ये सभा घेणार आहेत.
 • छत्रपती संभाजीनगर येथे खासदार नवनीत राणा दुपारी २ वाजता महिला मेळावा घेणार आहेत.
 • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुपारी ३.३० वाजता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे सभा घेणार आहेत.
 • संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदा छत्रपती संभाजीनगर शहरात रॅली काढणार आहे.
 • महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे बीडच्या परळी येथे दुपारी १२ वाजता जाहीर सभा घेणार आहेत.

हेही वाचा :

Hanooman AI भारतात लाँच; 98 भाषांमध्ये काम करणार अ‍ॅप

महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून हायअलर्ट

धोनीचा क्रेझी फॅन अचानक घुसला मैदानात… धरले ‘थला’चे पाय अन्…