केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी: घोषणांच्या पलीकडे कृती शून्य

कोल्हापूर, १२ सप्टेंबर २०२४:
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या (theater)पुनर्बांधणीसाठी मोठ्या घोषणा आणि आश्वासने देऊन महिनाभर झाला असला तरी प्रत्यक्षात काहीच प्रगती दिसून येत नाही. ८ ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाला मोठा धक्का बसला होता. राजकीय नेत्यांकडून आणि प्रशासनाकडून नाट्यगृह पुनर्बांधणीसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात कामाचा वेग कासवगतीचा असून निधीची घोषणा फक्त कागदावरच राहिली आहे.

प्रशासनाची कुचराई आणि जनता अस्वस्थ
नाट्यगृहाच्या आगीत संपूर्ण सांस्कृतिक वारसा बेचिराख झाल्यानंतर कोल्हापूर महापालिकेवर ताशेरे ओढले गेले. तरीही महापालिका आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. समितीने नेमलेली चौकशीही काही निष्कर्षावर पोहोचली नाही. या संदर्भात बाबा इंदुलकर यांच्या नेतृत्वाखाली केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन कृती समितीने मेणबत्ती मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
राजकीय आश्वासने पण कृतीचा अभाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेत्यांनी देखील निधी कमी पडणार नाही, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात या निधीच्या वितरणात कोणतीही प्रगती नाही. शरद पवार आणि सतेज पाटील यांच्या देखील निधी संबंधित घोषणांवर काहीच हालचाल दिसून येत नाही.
नाट्यगृहाची पुनर्बांधणी नेमकी कशी करावी यावर सध्या रंगकर्मींमध्ये मतभेद आहेत. काहींना हे नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच उभे राहावे असे वाटत असताना, इतरांकडून आधुनिक सोयींनी युक्त नवे नाट्यगृह उभारावे अशी मागणी होत आहे. या मतभेदांमुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकांचा संताप उफाळला
नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी हालचाली सुरू न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. कृती समितीने या संदर्भात प्रशासनाचा निषेध करत पुन्हा हालचाली गतीमान कराव्यात, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा:
वयाच्या चाळिशीतही दिसाल २५ वर्षांचे! जाणून घ्या घरगुती उपायांचे रहस्य