टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं केलं अनावरण
टी20 वर्ल्डकप जेतेपदासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. गेल्या 11 वर्षांपासून टीम इंडियाची जेतेपदाची झोळी रिती आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाची संधी चालून आली होती. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं आणि जेतेपदाचं स्वप्न भंगलं. आता टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी चषकासाठी सज्ज झाली आहे. यासाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. टीम इंडियाचे किट प्रायोजकत्व हक्क विकत घेतलेल्या एडिडासने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांच्या उपस्थितीत धर्मशाळा येथे आगामी टी20 वर्ल्डकप जर्सीचं अनावरण केलं. या जर्सीत निळ्या रंगासोबत आणि भगवा रंगही आहे. एडीडासने जारी केलेल्या जर्सी अनावरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. जर्सी अनावरणाच्या कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा दिसत आहेत.
जर्सी अनावरणावेळी कर्णधार रोहित शर्मा हा कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाला जवळ बोलवून जर्सीकडे बोट दाखवतो. जर्सी एका हेलिकॉप्टरला लटकलेली दिसते. नव्या जर्सीवर पांढरी पट्टी आहे आणि मधे निळा रंग आहे. तसेच हाताच्या बाजूला भगवा रंग आहे. निळ्या आणि भगव्या रंगाचं कॉम्बिनेशन जबरदस्त दिसत आहे. जर्सीच्या मध्यभागी टीम इंडिया असे लिहिलेले आहे. वनडे आणि टी20 साटी वेगवेगळी जर्सी असते. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध आहे. त्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत सामना होणार आहे. हा सामना 9 जून रोजी होणार आहे.
T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवराज, चहल पटेल. संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू- रिंकू सिंग, शुभमन गिल, खलील अहमद, आवेश खान.