यूट्यूबसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यूट्यूबवर वेळ घालवणाऱ्या लाखो मुलांवर याचा परिणाम होणार आहे. यूट्यूबमुळे(YouTube) लहान वयातील मुलांवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, यूट्यूबवर निर्बंध :
ऑस्ट्रेलिया सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना यूट्यूबवर अकाऊंट उघडण्यास बंदी घातली आहे. याआधीच टिकटॉक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि एक्स (ट्विटर) यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ऑस्ट्रेलियात बंधनं आणली गेली आहेत. ई-सेफ्टी कमिश्नरच्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यूट्यूबवरून(YouTube) लहान मुलांना हानिकारक कंटेंट दिसतो, असा तर्क देत ही कारवाई करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीझ यांनी सांगितले की, “या डिजिटल युगात मुलांचे मानसिक स्वास्थ्य आणि सुरक्षा हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे.”
यूट्यूबवर काय बंद होणार? :
16 वर्षांखालील मुलांना आता यूट्यूबवर अकाऊंट उघडता येणार नाही. मात्र, त्यांना यूट्यूबवर व्हिडीओ पाहता येतील. याउलट, कमेंट करणे, कन्टेंट तयार करणे आणि व्हिडीओ अपलोड करणे या सुविधा त्यांच्यासाठी बंद करण्यात आल्या आहेत.
ई-सेफ्टी कमिश्नरच्या आकडेवारीनुसार, 10 ते 15 वयोगटातील चारपैकी तीन मुलं यूट्यूब रोज पाहतात. या प्लॅटफॉर्मवर 37% मुलांना हानिकारक कंटेंट आढळल्याचंही त्यांच्या सर्व्हेमधून समोर आलं आहे.
भारतात असा निर्णय होणार का? :
सध्या तरी भारतात यूट्यूब संदर्भात अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयावर आता जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. भारतातही पालक आणि तज्ज्ञ याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा :