अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जो बायडेन गंभीर आजाराने त्रस्त

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष(President) जो बायडेन यांच्यावर एक धक्का बसणारी वैद्यकीय माहिती समोर आली आहे. १८ मे रोजी त्यांच्या कार्यालयाकडून बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. या घोषणेनंतर संपूर्ण अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात चिंता व्यक्त केली जात आहे, तर अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

बायडेन यांच्यावर झालेल्या वैद्यकीय तपासणीत, ग्लीसन स्कोअर ९ (ग्रेड ग्रुप ५) असलेल्या आक्रमक स्वरूपाच्या कर्करोगाची पुष्टी झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात हा स्कोअर सर्वात गंभीर स्तरातील कर्करोग मानला जातो, ज्यात पेशी अतिशय वेगाने पसरतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्करोग आता हाडांपर्यंत पसरला आहे. याला वैद्यकीय भाषेत मेटास्टेसिस असे म्हणतात. तथापि, हा कर्करोग हार्मोन-संवेदनशील असल्यामुळे योग्य आणि सुसंगत उपचारांनी तो काही प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकतो. सध्या बायडेन आणि त्यांचे कुटुंब योग्य उपचार पर्यायांचा विचार करत आहेत.

प्रसिद्ध अमेरिकन नेत्या हिलरी क्लिंटन यांनीही ट्विटरवर भावना व्यक्त करत लिहिले की, “बायडेन यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आता त्यांनाच त्याच शक्तीची आवश्यकता आहे.” अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “या कठीण काळात मी आणि माझी पत्नी जेनेट, बायडेन कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करत आहोत.”

ग्लीसन स्कोअर ९/ग्रेड ग्रुप ५ याचा अर्थ असा की कर्करोगाची पेशी अत्यंत जलदगतीने वाढतात आणि पसरतात. अशा प्रकारचा कर्करोग जर वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास प्राणघातक ठरू शकतो. मात्र, सुदैवाने, बायडेन यांना झालेला कर्करोग हार्मोन-संवेदनशील असल्यामुळे हार्मोन थेरपी, किरणोत्सर्ग आणि केमोथेरपी यांसारख्या उपायांनी त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे.

जो बायडेन यांच्यावर आलेल्या या संकटामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात आणि जनमानसात सहानुभूतीची लाट उसळली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी संपूर्ण जगातून प्रार्थना केली जात आहे. ते केवळ एक राजकीय नेता नाहीत, तर अनेकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या बळकट इच्छाशक्तीवर आणि चिकाटीवर जगभरातून विश्वास व्यक्त केला जात आहे. संपूर्ण जग जो बायडेन यांच्या लवकरात लवकर पूर्ण बरे होण्याची प्रतीक्षा करत आहे.

हेही वाचा :

धरण कर्नाटकाचे, मरण महाराष्ट्राचे; अलमट्टी धरणावरून नेमका वाद काय ?

आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवल्याने शरीराला होतात असंख्य फायदे

Shahid Afridi ने विकली लाज, ओलांडल्या साऱ्या मर्यादा! कॅमेऱ्यासमोर…घेतला KISS Video