मराठवाड्यात शनिवारी सकाळी अचानक भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये हे हादरे जाणवले. सकाळी सुमारे ८.४६ वाजण्याच्या सुमारास जमिनीला हलकेच कंप जाणवताच अनेकांच्या घरातील भांडी आणि वस्तू हलल्या, काही ठिकाणी स्वयंपाकघरातील मांडणीवरील भांडी खाली पडल्याचेही दिसून आले.
हिंगोली शहरासह वसमत आणि कळमनुरी परिसरात लोक (earthquake) घाबरून घराबाहेर पडले. अचानक आलेल्या या धक्क्यामुळे लहान मुलांमध्ये विशेषतः भीतीचे वातावरण होते. अनेक नागरिक सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्त्यावर एकत्र जमले होते. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवित किंवा मोठी वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातील दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर आणि चंदीगड परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या वेळी भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात असल्याचे सांगण्यात आले होते. आता मराठवाड्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भूकंपाचा नेमका केंद्रबिंदू आणि तीव्रता किती होती, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा
SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार
सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत
GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?