‘प्लॅनेट ऑफ द एप्स’ खरे ठरले! चिंपांझींचं रक्तरंजित युद्ध; मित्र झाले वैरी, २८ जणांचा अंत, जंगलात हाहाकार! कारण काय?

युगांडातील किंबाले राष्ट्रीय उद्यान येथे चिंपांझींच्या एका मोठ्या समुदायात सुरू (chimpanzees) झालेला संघर्ष आता भीषण वळणावर पोहोचला आहे. एकेकाळी एकत्र राहणारा हा समुदाय आता दोन गटांत विभागला गेला असून, त्यांच्या दरम्यान सुरू असलेल्या हिंसक चकमकींमध्ये आतापर्यंत २८ हून अधिक चिंपांझींचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता असून, परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत आहे.

या घटनांनी हॉलीवूडमधील Planet of the Apes या चित्रपट मालिकेची आठवण करून दिली आहे. मात्र, येथे घडणाऱ्या घटना काल्पनिक नसून प्रत्यक्षात घडत आहेत. संशोधकांच्या मते, २०१८ पासून या समुदायात हळूहळू तणाव वाढू लागला. एकेकाळी २०० पेक्षा अधिक सदस्य असलेला हा गट परस्पर सहकार्य, अन्न वाटप आणि सामाजिक नात्यांमुळे ओळखला जात होता. पण कालांतराने त्यांच्यातील संबंध सैल झाले आणि छोटे-छोटे गट तयार होऊ लागले.

National Geographic च्या अहवालानुसार, या दोन गटांना त्यांच्या स्थानानुसार ओळख दिली गेली आहे. पश्चिम भागातील गट अधिक आक्रमक बनला असून, तो मध्य भागातील चिंपांझींवर नियोजनपूर्वक हल्ले करत आहे. हे चिंपांझी सीमाभागात दबा धरून बसतात आणि एकट्या किंवा दुर्बल सदस्यांवर अचानक हल्ला चढवतात. त्यामुळे मध्य गटाची संख्या सातत्याने कमी होत आहे, तर पश्चिम गट आपला प्रभाव वाढवत आहे.

या संघर्षामागे अनेक कारणे असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. २०१९ मध्ये ‘बेसी’ नावाच्या चिंपांझीवर तिच्याच गटातील सदस्यांनी केलेल्या हल्ल्याने या संघर्षाला निर्णायक वळण मिळाले. त्या घटनेने गटात खोल फूट पडली. काही वयस्कर चिंपांझींनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या मृत्यूमुळे नेतृत्व कमकुवत झाले. त्याच काळात एका नव्या नर चिंपांझीने नेतृत्व घेतल्याने तणाव आणखी वाढला.

याशिवाय २०१४ आणि २०१७ मधील रोगांच्या साथीमुळे समुदाय आधीच कमकुवत झाला होता. त्यानंतर चिंपांझींच्या वर्तनात मोठा बदल दिसून आला. एकमेकांशी संवाद कमी झाला, एकत्र राहण्याची सवय कमी झाली आणि सामाजिक बंधन सैल झाले. परिणामी, एकेकाळचे सहकारी आता एकमेकांचे शत्रू बनले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, हा संघर्ष केवळ प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यापुरता मर्यादित नसून, सामाजिक संरचना कोसळल्याचेही द्योतक आहे. या घटनेमुळे प्राण्यांच्या समाजातही मानवी समाजासारखे तणाव, सत्ता संघर्ष आणि गटबाजी कशी निर्माण होऊ शकते, याचे गंभीर चित्र समोर आले आहे.

हेही वाचा

SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार

सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत

GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?