यंदाच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामावर ‘एल-निनो’चे सावट असल्याने देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या सुमारे ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, त्यात पाच टक्क्यांपर्यंत तफावत संभवते. या अंदाजामुळे विशेषतः शेती, पाणीपुरवठा आणि जलसाठ्यांबाबत चिंता वाढली आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा (below average) यांनी पत्रकार परिषदेत हा दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना सांगितले की, प्रशांत महासागरातील तापमानातील बदल, भारतीय महासागरातील द्विध्रुवीय स्थिती आणि उत्तर गोलार्धातील हिमाच्छादन या घटकांचा सखोल अभ्यास करून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मॉन्सून काळात ‘एल-निनो’ स्थिती विकसित होण्याची शक्यता अधिक असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता ६६ टक्के आहे. सरासरी पावसाची शक्यता २७ टक्के असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता केवळ ७ टक्के इतकी मर्यादित आहे.
देशाच्या बहुतांश भागात यंदा कमी पावसाचे संकेत देण्यात आले असून, अतिउत्तरेकडील भाग, पूर्वोत्तर राज्ये आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भाग वगळता इतर प्रदेशांमध्ये पर्जन्यमान घटण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाण्याच्या नियोजनाची गरज अधोरेखित झाली आहे. विशेषतः महाराष्ट्रासाठी हा अंदाज अधिक चिंताजनक ठरत असून, राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकेत आहेत. पूर्व विदर्भातील काही भागात तुलनेने चांगला पाऊस होण्याची शक्यता असली तरी उर्वरित भागात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक असून अकोल्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून, पुढील काही दिवसांत विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही पाणीपुरवठा व्यवस्थापनात त्रुटी दिसून येत आहेत. टँकर पुरवठ्याबाबत अद्ययावत माहिती देण्यात होत असलेला विलंबही चिंतेचा विषय ठरत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर, गळती रोखणे, पुनर्वापर वाढवणे आणि शेतीत जलसंधारण तंत्रांचा वापर करणे अत्यावश्यक ठरत आहे. शाश्वत पाणी व्यवस्थापनासाठी जनजागृती आणि काटेकोर अंमलबजावणी हाच पुढील काळातील मोठा आधार ठरणार आहे.
हे ही वाचा ;
मोबाईलच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या कंपनीचे फोन किती महाग झाले?
लाडक्या बहिणींची अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता