राज्यभरात जुलैमध्ये पाऊस फारसा सक्रिय नसल्याचे पूर्वानुमान देण्यात आले होते. त्यानुसार (rains)आता १७ ते २४ जुलै दरम्यानच्या आठवड्यातही राज्यात फारसा पाऊस नसेल अशी शक्यता आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत महाराष्ट्रात सरासरीच्या चार टक्के पाऊस अधिक झाला आहे.
जुलैचा विचार केला तर सरासरीहून दोन टक्के अधिक पाऊस आहे. मात्र राज्याच्या आठ जिल्ह्यांत सरासरीहून(rains) कमी पाऊस तर तीन जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्र तूट नोंदवली गेली आहे. कोकण विभागात जुलैमध्ये फारसा पाऊस नसल्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट नोंदवली गेली आहे.
मुंबई शहरामध्ये २३ टक्के तर, मुंबई उपनगरामध्ये २० टक्के तूट होती. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, सातारा, सोलापूर मराठवाड्यात बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट नोंदली गेली तर विदर्भातही अकोला, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे.(rains) यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक तूट असून मराठवाडा विभागात एकूण तूट ४६ टक्के आहे. राज्यात सर्वाधिक तूट बीडमध्ये असून बीडमध्ये सरासरीच्या केवळ २५ टक्के पाऊस पडला आहे. सोलापूरमध्येही केवळ ३२ टक्के पाऊस पडला आहे.
कोकण विभागाचा गेल्या आठवड्याचा विचार केला तर मुंबई शहरामध्ये सर्वाधिक म्हणजे, ७१ टक्के पाऊस त्या आठवड्याच्या सरासरीहून कमी पडल्याचे दिसते. गेल्या आठवड्यात मुंबई उपनगरात २३ टक्के, पालघर जिल्ह्यात ५५ टक्के, ठाणे जिल्ह्यात ३३ टक्के पावसाची तूट होती. मध्य महाराष्ट्रात धुळे येथे ८० टक्के, सोलापूर येथे ७० टक्के पाऊस सरासरीहून कमी पडला आहे. हिंगोली येथे ९५ टक्के, जालना येथे ८९ टक्के तर परभणी येथे सरासरीच्या ९१ टक्के पाऊस कमी पडला आहे. विदर्भातही या कालावधीत फारसा पाऊस नव्हता.
मुंबईमध्ये गुरुवारी कुलाबा येथे ३१.४ तर सांताक्रूझ येथे ३१.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसभरात आर्द्रतेचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक असल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक तापमान असल्याची जाणीव मुंबईकरांनी व्यक्त केली. आर्द्रतेमुळे आणि पावसाच्या अभावामुळे अस्वस्थता निर्देशांक अधिक होता.
हेही वाचा :