अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या तब्बल ६ कंपन्यांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी)(sebi) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कंपन्यांवर संबंधित पक्षाच्या व्यवहारांचे कथित उल्लंघन, लिस्टिंगच्या नियमांचे पालन न करणे आणि ऑडिटर प्रमाणपत्रांची वैधता यासंबंधी आरोप करण्यात आले आहेत.
स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या नियामक फाइलिंगमध्ये या कंपन्यांनी ही माहिती दिली आहे. अदानी एंटरप्रायझेसने गुरुवारी सांगितले की, ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीसाठी त्यांना दोन कारणे दाखवा नोटीस मिळाल्या आहेत. याशिवाय अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी विल्मार आणि अदानी टोटल गॅस या समूहातील इतर कंपन्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
या कंपन्यांचे म्हणणे आहे की, सेबीच्या(sebi) नोटीसचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे अदानी विल्मार आणि अदानी टोटल गॅस वगळता सर्व कंपन्यांच्या लेखा परीक्षकांनी याबाबत आपलं मत जारी केले आहे. यानुसार, सेबीच्या तपासणीच्या निकालांचा परिणाम भविष्यात या कंपन्यांच्या आर्थिक विवरणांवर होऊ शकतो. हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध केला होता. यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
मात्र, गटाने हे आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान, सेबीने या आरोपासंदर्भात चौकशी देखील केली होती. सेबीने ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले होते, की त्यांनी १३ संबंधित पक्ष व्यवहार ओळखले आहेत, ज्यांची चौकशी केली जात आहे.
हेही वाचा :
‘नाच गं घुमा’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई
काय सांगता! रडणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे
पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट