फळांचा राजा ‘आंबा’ पुण्यात दाखल
पुणे बाजार समितीच्या आवारात आंबा हंगाम जोरात सुरू झाला आहे. मात्र, या आंब्याची समिती आणि व्यापारी यांच्याकडे हाेणाऱ्या नाेंदीत तफावत असल्याची बाब पुढे आली आहे. आवक आणि सेस मध्ये लपवा छपव करण्यासाठीच वरिष्ठांना डावलून आपल्या ऐकणीतल्या कनिष्ठ अधिकार्याची विभाग प्रमुखपदी वर्णी लावून घेतल्याची चर्चा बाजारात आहे. त्यामुळे यंदा आंबा हंगाम चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी येथील फळ बाजारात सध्या दररोज कोकण हापुस आणि कर्नाटक सह परराज्यातील आंब्याची एकूण सुमारे ८ ते १० हजार पेट्यांची आवक होत आहे. पाडव्यापासून म्हणजेच आठ ते दहा दिवसांनी ही आवक दुप्पट ते चौपट होईल. मात्र आत्ताच बाजार समितीकडून आंबा आवक घेण्यात गोलमाल सुरू झाला आहे. बाजार समितीकडून सांगितली जाणारी, बाजारात प्रत्यक्ष आवक आणि व्यापारी यांच्याकडून सांगितली जाणारी आवक मध्ये तफावत आढळून येत आहे. पुणे बाजार समितीत शेतमाल आवक लपवाछपवी हे समीकरण नवे नाही. दरवर्षी असे प्रकार सुरू असतात. आता मात्र संचालक मंडळ असून मर्जीतल्या आडत्यांची आंबा आवकमध्ये मोठ्या प्रमाणात लपवाछपवी सुरू झाल्याची चर्चा बाजारात आहे. यासाठीच आपल्या मर्जितील कर्मचार्याची विभाग प्रमुख पदी बदली करून घेतली आहे.
फळे व भाजीपाला विभागात पंधरा फुटांपेक्षा जास्त जागेचा वापर करत रस्त्यावर व्यापार सुरू आहे. काही अडते रस्त्यावर वाहने लावून वाहनांतून व्यापार करतात. काही माननियांच्या गाळ्यावर तब्बल दहा ते पंधरा डमी अडते दुबार विक्री करतात. मात्र, तोंडदेखली पाच- दहा हजारांची कारवाई करून अनेकांना मुभा दिली जाते. तर, फळे भाजीपाला विभागातील गट प्रमुख, कर्मचार्यांनी गेटवर सिक्युरीटीच्या केबिन, पार्किंग परिसरात अड्डा बनविला आहे. फळ विभागातील काही रोजंदारी कर्मचारी साहेब लोकांच्या पिशव्या भरून आपला रोज भरत आहेत.