प्रयागराज येथे बुधवारी संध्याकाळी एक अतिशय भीषण रेल्वे अपघात घडला असून या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यमुनानगर झोनमधील करछना परिसरात ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिस आणि जीआरपीच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले.

प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या (train accident) सुमारास त्या मार्गावरून जाणाऱ्या १२३१२ क्रमांकाच्या ट्रेनच्या लोको पायलट आणि गार्डला रुळांवर एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाला माहिती दिली, त्यानंतर संबंधित ट्रेन थांबवण्यात आली. मात्र, काही वेळातच त्याच रुळावरून जाणाऱ्या पुरुषोत्तम एक्स्प्रेस या गाडीची धडक बसल्याने आणखी चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण धडकेत सर्व मृतदेह दूरवर फेकले गेले आणि त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती.
ही दुर्घटना प्रयागराज विभागातील रचना-भिरपूर मार्गावर घडली. मृतांमध्ये फिरोजाबाद जिल्ह्यातील खैरगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या गिरिराज, आकाश, अजय आणि मुन्ना पासी यांचा समावेश आहे. हे सर्व जण कोलकाताकडे प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेबाबत योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रेल्वे प्रशासनाने याबाबत सखोल तपास सुरू केला आहे.
हेही वाचा
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार
इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय