युद्धाची झळ, भारताला फटका; युद्धामुळे 25 लाख भारतीय गरीब होणार? 

जगात कुठेही युद्ध पेटलं की त्याचे पडसाद फक्त त्या दोन (repercussions) देशांपुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटतो. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात जगाने महागाई, इंधन दरवाढ आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा मोठा फटका सहन केला. आता सुरू असलेल्या आखाती संघर्षामुळे पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या आर्थिक संकटाची शक्यता व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (UNDP) ताज्या अहवालाने अनेक देशांची चिंता वाढवली आहे.

या अहवालानुसार, युद्धाचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावर होणार असून इराणमध्ये तब्बल ५० लाखांहून अधिक लोक गरिबीत ढकलले जाण्याची शक्यता आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसू शकतो. अंदाजे २४ लाख ६४ हजारांहून अधिक भारतीय नागरिक दारिद्र्यरेषेखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांनाही या संकटाचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतातील परिस्थिती अधिक चिंताजनक मानली जात आहे, कारण देशातील मोठा हिस्सा असंघटित क्षेत्रावर अवलंबून आहे. ऊर्जा आणि इंधन क्षेत्रावर सर्वाधिक ताण येण्याची शक्यता असून पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढेल. त्याचा थेट परिणाम अन्नधान्य, भाजीपाला आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर होऊन महागाई आणखी वाढू शकते.

युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. कापड, चामडे, हिरे आणि दागिने यांसारख्या उद्योगांच्या निर्यातीवर परिणाम होऊन लाखो कामगारांच्या रोजगारावर संकट येऊ शकते. विशेषतः हॉटेल, बांधकाम, अन्नप्रक्रिया आणि स्टीलसारख्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांना याचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.
पश्चिम आशियातील देशांमध्ये काम करणाऱ्या सुमारे ९३ लाख भारतीय कामगारांसाठीही ही परिस्थिती धोक्याची ठरू शकते. युद्ध लांबल्यास रोजगार कमी होणे, पगारात कपात किंवा परत भारतात यावे लागणे, अशा अडचणी निर्माण होऊ शकतात.

एकीकडे वाढती बेरोजगारी आणि दुसरीकडे वाढती महागाई यामुळे सामान्य नागरिक दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य आर्थिक धक्का कमी करण्यासाठी भारताने आतापासूनच इंधन आणि खतांच्या पर्यायी स्रोतांचा शोध घेणे, तसेच आयात-निर्यात धोरण मजबूत करणे आवश्यक ठरणार आहे.

हेही वाचा

लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार

इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक