कोल्हापूर : ‘ती’ गाडी आली अन् 10 वर्षांच्या मुलाला घेऊन गेली; पण ग्रामस्थांनी पाठलाग केला नंतर…

शिरोली : टोप येथील दक्षिणवाडीमध्ये राहणाऱ्या आयुष अर्जुन पाटील या 10 वर्षीय अल्पवयीन मुलाचा काही अज्ञातांनी अपहरण(Kidnapping) करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. रत्नागिरी-नागपूर हायवेवर टोप येथील दक्षिणवाडी हद्दीमध्ये लहान मुले गुरुवारी दुपारी क्रिकेट खेळत होती. अचानक दुपारी सफेद कलरची ओपन टफ जीप त्याठिकाणी आली आणि त्यांनी आयुष यास गाडीत घालून पळवून नेले.

या घटनेनंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या लहान मुलांनी आरडाओरडा केला असता शेजारील शेतामध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्या गाडीचा पाठलाग केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना पाठलाग करणाऱ्या नागरिकांनी माहिती दिली. त्यांनी तात्काळ या गाडीचा पाठलाग केला. त्या जीपला ओव्हरटेक करून गाडी थांबवली. त्यानंतर तात्काळ अपहरणकर्त्यांनी(Kidnapping) त्या मुलास जीपमधून खाली फेकून दिले व सुसाट वेगाने गाडी शिये फाट्याच्या दिशेने पळवली.

त्या गाडीचा ग्रामस्थांनी शिये फाट्यापर्यंत पाठलाग केला असता गाडी मिळून आली नाही. ती गाडी कसबा बावडा या दिशेने निघून गेल्याचे पाठलाग करणाऱ्या युवकांनी सांगितले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर लहान मुले भेदरलेली होती. ही गाडी यापूर्वी दोन-तीन वेळा या परिसरात येऊन गेल्याचे लहान मुलांनी सांगितले. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा :

उन्हाळ्यात ‘या’ तीन प्रकारचे चविष्ट कांजी प्या, आरोग्यासाठीही फायदेशीर

नौदल आधिकाऱ्याची पत्नी हिमांशी नरवालबद्दल मोठी माहिती समोर, एल्विश यादवसोबत खास नातं!

‘हे योग्य नाही…’, सनरायझर्सविरुद्धच्या पराभवानंतर धोनी संतापला, कोणाला धरले जबाबदार?