छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील लोणगाव-डोणगाव परिसरातून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. माकडाच्या एका लहान पिलाच्या डोक्यात पाण्याचा तांब्या अडकल्याने (monkey) त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली होती. मात्र, स्थानिक प्राणीमित्राच्या तत्परतेमुळे त्या निष्पाप जीवाला वेळेत मदत मिळाली आणि त्याचा जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात फिरत असताना पाण्याच्या शोधात किंवा खेळताना त्या माकडाच्या पिलाने तांब्यात डोकं घातलं असावं. मात्र, त्यानंतर तांब्या इतका घट्ट अडकला की त्याला ना व्यवस्थित श्वास घेता येत होता, ना काही दिसत होतं. डोक्यावर तांब्या अडकल्यामुळे पिलू पूर्णपणे घाबरलं होतं. अन्न-पाणी घेणंही अशक्य झाल्याने त्याची तडफड सुरू होती. पिलाची अवस्था पाहून परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करत होते.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्राणीमित्र समाधान गिरी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, बचावकार्य तितकं सोपं नव्हतं. आपल्या पिलाला त्रास होत असल्याचं पाहून परिसरातील इतर माकडं आक्रमक झाली होती. (monkey) त्यामुळे त्या पिलाजवळ जाणं मोठं आव्हान ठरत होतं. तरीही समाधान गिरी यांनी संयम राखत परिस्थिती हाताळली. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पिलाला शांत करत सुरक्षितपणे ताब्यात घेतलं.
यानंतर त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक पिलाच्या डोक्यात अडकलेला तांब्या काढण्यास सुरुवात केली. काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर (monkey) त्यांनी तो तांब्या अलगद बाहेर काढला. तांब्या निघताच पिलाने मोकळा श्वास घेतला आणि काही क्षणांतच ते पूर्ववत झालं. त्यानंतर पिलाने पुन्हा हालचाल सुरू केल्याचं पाहून उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान गिरी यांच्या धाडसाचं आणि संवेदनशीलतेचं कौतुक केलं. वेळेवर मदत मिळाल्याने एका मुक्या जीवाला नवजीवन मिळालं. लोणगाव-डोणगाव परिसरातील ही घटना माणुसकी आणि प्राण्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचं जिवंत उदाहरण ठरली आहे.
हेही वाचा
मान्सूनसंदर्भात महत्वाची बातमी ‘या’ तारखेला होणार एन्ट्री