दुचाकीला धक्का लागला… एसटी चालकाला महिलेनं रस्त्यातच चपलांनी चोपलं, व्हिडिओ व्हायरल

आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी (ST) महामंडळाची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील असले तरी, बस चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कर्नाळा परिसरात नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, एका महिलेनं एसटी बस चालक आणि वाहकाला चपलांनी जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एसटी(ST) बसमुळे दुचाकीला किरकोळ धक्का लागला. यानंतर संबंधित महिला संतप्त झाली. तिने रागाच्या भरात चालक अन् वाहकाला अक्षरशः चपलांनी मारहाण केली. या प्रसंगी अनेकांनी व्हिडिओ चित्रीकरण केले, मात्र कोणीही चालकाला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही, ही बाब अधिकच चिंताजनक ठरते.

घटना डेपो परिसरात घडली आहे. डेपोमध्ये सुरक्षा रक्षक तैनात असतानाही त्यांनी हस्तक्षेप का केला नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी नेमलेले सुरक्षा रक्षक अशा वेळी निष्क्रिय का राहतात? यावर एसटी कर्मचारी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणात संबंधित चालकाने अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये आपसात तडजोड करत तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनीही कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, एसटी कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, अशा घटनांमध्ये कायद्याचा आदर राखला गेला पाहिजे. गुन्हा दाखल होणे आवश्यक होते, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत.

एसटी चालक संघटनेचे काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी स्पष्टपणे सांगितले की, रस्त्यावर एखादा धक्का लागल्यावर बस चालकांवर हात उचलणं हा कायद्याचा अवमान आहे. जर यावर नियंत्रण न आणलं, तर भविष्यात चालकांच्या सुरक्षिततेवर मोठं संकट निर्माण होऊ शकतं.या घटनेने पुन्हा एकदा एसटी चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहन चालवताना दक्षता घेणं आवश्यकच, पण चुकीचं असलं तरी मारहाण हा उपाय होऊ शकत नाही. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.

हेही वाचा :

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 1 ऑगस्टपासून बॅलन्स चेकच्या नियमांमध्ये मोठा बदल

हृतिक रोशनची साऊथ सिनेमात एन्ट्री! निर्मात्यांनी केली घोषणा, लवकरच ‘या’ चित्रपटात दिसणार

सावधान! महाराष्ट्रासह देशात कोरोना बळावतोय, राज्यभरात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ