सांगलीत वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सांगली शहरातील एका अल्पवयीन मुलीवर 64 वर्षीय वृद्धाने खाऊचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा (Minor girl) संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोटात दुखू लागल्याने पीडित मुलीस रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय तपासणीत हा प्रकार समोर आला. या घटनेची गंभीर दखल घेत विश्रामबाग पोलिसांनी संशयित सुधीर शामराव नाईक (वय 64, रा. एकता कॉलनी, मार्केट यार्ड शेजारी, सांगली) याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुधीर नाईक हा आपल्या मुलासह एकता कॉलनीत राहतो आणि तो फिरून वाहने दुरुस्तीचे काम करतो. (Minor girl) त्याच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची पीडित मुलीशी ओळख झाली होती. या ओळखीचा आणि ती अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत संशयिताने कृत्ये सुरू केली. घरी एकटा असताना पीडित मुलीला कधी भजी, कधी डोसा तर कधी इतर खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी बोलावून घेत असे. नोव्हेंबर व डिसेंबर 2025 च्या सुमारास त्याने पीडित मुलीवर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला आणि या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. त्यानंतरही त्याने सातत्याने पीडित मुलीवर अत्याचार केले.

सोमवारी पीडित मुलीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल पाहताच पालकांना मोठा धक्का बसला. (Minor girl) त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने सुधीर नाईक याने केलेल्या अत्याचाराची सर्व हकिकत सांगितली.पालकांनी तातडीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयिताला तत्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन माने, हवालदार कविता नाईक, नंदकुमार मदने आणि प्रशांत माळी यांच्या पथकाने मंगळवारी सापळा रचून संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या. संशयिताला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक भालेराव यांनी सांगितले.

हेही वाचा

मान्सूनसंदर्भात महत्वाची बातमी ‘या’ तारखेला होणार एन्ट्री

बनावट, निकृष्ट औषधांवर ‘सीडीएससीओ’चा बडगा

रंकाळा प्रदूषणाबाबत महापालिकेला नोटीस