मधुमेह हा आज केवळ वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न न राहता भारतासाठी (economy)एक गंभीर सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हान बनत चालला आहे. जीवनशैलीशी संबंधित हा दीर्घकालीन आजार रक्तातील साखरेची पातळी सातत्याने वाढलेली राहिल्यामुळे होतो. शरीरात इन्सुलिन हार्मोनची कमतरता निर्माण होणे किंवा इन्सुलिन योग्य प्रकारे कार्य न करणे, हे मधुमेहामागील मुख्य कारण आहे. स्वादुपिंडातून तयार होणारे इन्सुलिन रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचवते, मात्र या प्रक्रियेत बिघाड झाल्यास साखर रक्तातच साचून राहते आणि मधुमेहाची सुरुवात होते.असंतुलित आहार, जास्त साखर आणि जंक फूडचे सेवन, कमी शारीरिक हालचाल, वाढलेले वजन आणि आनुवंशिकता ही मधुमेह वाढण्याची प्रमुख कारणे मानली जातात. याशिवाय बदलती जीवनशैली, सततचा तणाव, अपुरी झोप, मानसिक असंतुलन, दारूचे अति सेवन, धूम्रपान आणि शारीरिक निष्क्रियता यामुळेही इन्सुलिन प्रतिकारशक्ती वाढते. महिलांमध्ये हार्मोनल बदल, गर्भावस्थेतील मधुमेह, तसेच थायरॉईडसारखे इतर विकारही मधुमेहाचा धोका वाढवतात.

मधुमेह रोखण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, (economy)तणावमुक्त जीवनशैली आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. मात्र, दुर्लक्ष केल्यास मधुमेहामुळे हृदयरोग, किडनी निकामी होणे, दृष्टीदोष आणि मज्जासंस्थेचे विकार यांसारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात.मधुमेहाचे परिणाम केवळ आरोग्यापुरते मर्यादित न राहता थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहेत. एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, मधुमेहामुळे भारताला सुमारे 11.4 ट्रिलियन डॉलर्सचे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिका पहिल्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या भारतात सुमारे 21 कोटींपेक्षा अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त असल्याचे आकडेवारी सांगते. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी जवळपास 62 टक्के रुग्ण कोणतेही उपचार घेत नाहीत.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड सिस्टम्स अॅनालिसिस, हार्वर्ड विद्यापीठ,(economy) व्हिएन्ना विद्यापीठ आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संशोधनानुसार, उपचार खर्च, काम न करू शकल्याने होणारे आर्थिक नुकसान आणि रुग्णांच्या देखभालीसाठी लागणारा वेळ यामुळे मधुमेहाचा आर्थिक भार प्रचंड वाढतो. जगभरात मधुमेहामुळे होणारे आर्थिक नुकसान सुमारे 10.2 ट्रिलियन डॉलर्स इतके आहे. कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत काळजीचा खर्च धरल्यास हे नुकसान आणखी वाढते.भारतात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मधुमेहाचे ओझे अधिक तीव्रतेने जाणवते. उपचार न घेतल्यामुळे अनेक रुग्ण नियमित काम करू शकत नाहीत, तर कुटुंबातील सदस्यांनाही त्यांची काळजी घ्यावी लागते. परिणामी उत्पादकता घटते आणि आर्थिक ताण वाढतो. त्यामुळे मधुमेह हा आता केवळ एक आजार न राहता देशासमोरील एक मोठे सामाजिक आणि आर्थिक संकट बनले असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाय आणि मजबूत आरोग्य व्यवस्थेची नितांत गरज आहे.
हेही वाचा :
उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…
झुरळांना संपवण्यासाठी हे पान करेल खूप मदत, पाण्यात टाका स्वयंपाक घरातील हा पदार्थ
कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?