आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा उसळी घेत १०४ डॉलर्सचा टप्पा ओलांडला असताना, भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सोमवारी, १३ एप्रिल २०२६ रोजी सरकारी तेल कंपन्यांनी दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेला यश न आल्यामुळे जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, ज्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर दिसून येत आहे.

जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही देशांतर्गत बाजारात स्थिरता (crude oil prices) राखण्यात सरकारला यश आल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही इंधन दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबई येथे पेट्रोल ₹१०३.५४ तर डिझेल ₹९०.०३ प्रति लिटर आहे. पुणे मध्ये पेट्रोल सुमारे ₹१०४.७९ आणि डिझेल ₹९१.३२ आहे. नागपूर येथे पेट्रोल ₹१०३.९४ आणि डिझेल ₹९०.४८ दराने विकले जात आहे, तर नाशिक आणि औरंगाबाद येथेही दर पूर्ववत आहेत.
देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच ठेवण्यात आले आहेत. नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळूर आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमध्येही दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अस्थिरतेचा तातडीने ग्राहकांवर परिणाम झालेला दिसत नाही.
तथापि, औद्योगिक क्षेत्राला मात्र या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. औद्योगिक वापरासाठीच्या डिझेलच्या किमतीत सुमारे २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही वाढ झाली असून, विशेषतः नवी दिल्ली मध्ये १९ किलोच्या सिलेंडरची किंमत ₹२,०७८.५० वर पोहोचली आहे.
तज्ज्ञांच्या मते, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून इंधन दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी तेल कंपन्या विविध मार्गांचा अवलंब करत असून, रिफायनरींकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करून तोटा मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सध्या तरी दिलासा मिळत असला, तरी जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम पुढील काळात कसा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा;
एसटी प्रवास महागणार, हंगामी वाढ १५ एप्रिलपासून; किती रुपयांनी वाढले आकडेवारी आली
सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो ‘या’ 5 चुका टाळा
८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार?