“सध्या गुजरात भागातील सर्व पेट्रोल पंपांवर, रॉकेलच्या दुकानांबाहेर, गॅस वितरण केंद्रांवर चार-पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.”

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण नसताना लोकांना धमकावले आहे. लॉकडाऊनची अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई करू, असे ते म्हणतात. लॉकडाऊनची अफवा आहे असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वाटत आहे, पण त्यांनी लोकांमधील चिंता व अस्वस्थता समजून घेतली पाहिजे. या अफवेचा उगम पंतप्रधान मोदींचे गृहराज्य गुजरातमधून झाला आहे. सध्या गुजरात भागातील सर्व पेट्रोल पंपांवर, रॉकेलच्या दुकानांबाहेर, गॅस वितरण केंद्रांवर चार-पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. या रांगेत पाण्यासाठी वापरले जाणारे निळ्या रंगाचे ड्रम घेऊन लोक उभे आहेत. इंधनाचा साठा करायला हवा. लॉकडाऊन जाहीर झाला तर चूल पेटवायचे वांधे होतील, असं गुजरातच्या लोकांना वाटत असेल आणि तीच भीती महाराष्ट्राच्या जनतेला वाटली, तर मुख्यमंत्र्यांनी इतके भडकू नये,” असा सल्ला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला आहे.

“पंतप्रधान व गृहमंत्री हे गुजराती असल्यामुळे या राज्याकडे अशा बाबींची माहिती सगळ्यात आधी पोहोचते. म्हणजे नोटाबंदीचा आदेश मोदी यांनी जारी करण्याआधी आठेक दिवस गुजरातच्या बँकांच्या बाहेर मोठमोठ्या रांगा लावून लोक बँकेत पैसे जमा करत होते. अमित शहा ज्या बँकेचे अध्यक्ष होते त्या बँकेत म्हणे एका क्षणात पाचशे कोटींच्या एक हजारांच्या नोटा जमा झाल्या व काळ्याचे पांढरे करून घेतले गेले. कोविड काळात लॉकडाऊन होणार ही वार्ता सर्वात आधी गुजरातलाच समजली. हे भूतकाळातले वास्तव पाहिले तर गुजरातमधील सध्या लागलेल्या रांगा हेच लॉकडाऊनच्या अफवांचे मूळ आहे. (Gujarat) त्यामुळे गुजरातविरोधात अफवा पसरवण्याबाबत फौजदारी कारवाई महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी करायला हवी,” असा सल्ला ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

“फडणवीस यांचे म्हणणे आहे की, ‘महाराष्ट्रात सर्व आलबेल आहे. जगभरात युद्धाची परिस्थिती असताना इंधन दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे. अशा कठीण परिस्थितीत भारत सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करायला हवे. शेजारील देशांमध्ये इंधनाच्या तुटवड्यामुळे शाळा, कार्यालये, संस्था बंद करण्याची वेळ आली आहे. भारताने उत्तम व्यवस्थापनामुळे अशी वेळ येऊ दिली नाही. (Gujarat) याबद्दल खोटी माहिती पुरवणे गुन्हा ठरेल.’ मुख्यमंत्री महोदय, आपले विधान बेजबाबदारपणाचे आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील 50 टक्के हॉटेल्स व ढाबे गॅसटंचाईमुळे बंद पडले आहेत. काही जणांनी सरपण, कोळसा यांचा वापर करून मर्यादित स्वरूपात चुली पेटवून लोकांसाठी खानपान सेवा सुरू ठेवली, पण हा मार्गही खडतर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील फाऊंड्री उद्योग बंद झाला. गुजरातच्या मोरबी येथील टाईल्स बनवणाऱ्या 500 कंपन्या बंद झाल्या. त्यामुळे ‘अफवा पसरवू नका’ हे तुमचे विधान बेजबाबदारपणाचे आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

“कोणताही मागचा-पुढचा विचार न करता, विरोधी पक्षाशी चर्चा न करता मोदींनी नोटाबंदी लादली व कोविड काळात लॉकडाऊनसुद्धा लादले होते. इंधनटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावरही सत्तेतील जबाबदार मंडळींच्या बोलण्यात ताळमेळ नाही. (Gujarat) त्यामुळेच जनतेचा संभ्रम होतो आणि अफवांचे पीकही तरारून येते. लॉकडाऊनच्या चर्चांनाही यामुळेच तोंड फुटले आहे. लोकांमध्ये सरकारविषयी विश्वासाची भावना राहिलेली नाही आणि तो विश्वास निर्माण करणे सरकारचेच कर्तव्य आहे,” असंही ठाकरेंच्या शिवसेनेनं नमूद केलं आहे.

हेही वाचा :

उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट

मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *