कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गणेश उत्सवासाठी कोकणात आपल्या गावाला जाण्याच्या तयारीत असलेल्या भोजने कुटुंबावर(family) मानवी चुकीमुळे भयानक आपत्ती कोसळली आणि काही दिवसांचे अंतर ठेवून तिघा जणांना मृत्यूच्या कराल दाढेत जावे लागले. कळंबा परिसरातील मनोरमा नगरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही शोकांतिका घडली. आणि आता तीन आठवड्यानंतर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना सवड मिळाली आहे.

इतका विलंब का झाला हा प्रश्न कोणत्याही सामाजिक संघटनेला, लोकप्रतिनिधींना विचारावा असे वाटले नाही. अपवाद फक्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा. कारण त्यांनी अगदी पहिल्याच दिवशी संतप्त होऊन “या घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणालाही सोडणार नाही” अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.

दिनांक 25 ऑगस्ट च्या रात्री मनोरमा उपनगरातील भोजने कुटुंब(family) झोपण्याच्या तयारीत असताना थेट गॅस पाईप लाईन चा भीषण झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आसपास त्या घरांच्या खिडक्यांची तावदाने फुटली होती. संपूर्ण भोजने कुटुंब भाजून होरपळले होते.

शितल भोजने (वय 29) यांचा दिनांक 26 ऑगस्ट रोजी रुग्णालयात मृत्यू झाला. काही दिवसानंतर त्यांचे सासरे अनंत भोजने (वय 60) हे मृत्यूला सामोरे गेले. साडेतीन वर्षाच्या प्रज्वलची मृत्यूशी झुंज सुरू होती. बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी त्याला सुद्धा मृत्यूने गाठले. याच कुटुंबातील इशिका ही बालिका अशीच मृत्यूशी सामना करते आहे. एक हसते खेळते, नांदते कुटुंब या गॅस पाईपलाईनच्या स्फोटात उध्वस्त झाले ते कुणाच्यातरी चुकीमुळे, कुणाच्यातरी अक्षम्य दुर्लक्षामुळे. मात्र त्याची तातडीने दखल घ्यावी अशी संवेदनशीलता कुणी दाखवली नाही.

माहितीचा अधिकार अगदी प्रभावीपणे राबवणाऱ्या संघटनांना या गॅस पाईपलाईन दुर्घटनेची माहिती असूनही संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले नाही, जाब विचारला नाही, प्रसिद्धी पत्रक काढले नाही. घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यासाठी, रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करण्यासाठी कोणी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी रुग्णालयाकडे फिरकले नाहीत. शहरातील प्रत्येक रस्त्याच्या एका बाजूने, गल्लीबोळातील रस्त्याच्या एका बाजूने जमिनी अंतर्गत टाकण्यात आलेल्या गॅस पाईप लाईन म्हणजे”अग्निपथ”आहेत. पेरलेले सुरुंग आहेत. आणि या गॅस पाईपलाईनच्या कमाल पातळीवरच्या सुरक्षा व्यवस्थेवर कोणाला प्रश्न विचारावा असे वाटत नाही.

‌ दुर्दैवाने भोजने कुटुंबाच्या(family) शोकांतिकेला संबंधित गॅस पाईपलाईन कंपनी जबाबदार असल्याचे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले होते. त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करायला हवा होता. कारण फिर्याद द्यायला भोजने कुटुंबात कोणी उरलेच नव्हते. गॅस पाईपलाईन जोडल्यानंतर, कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता गॅस जोडणी देणाऱ्या कर्मचाऱ्यावर, गुन्हा दाखल करून चालणार नाही.

संबंधित गॅस कंपनीचा मुख्य अधिकारी, सुरक्षित गॅस जोडणी देण्याची जबाबदारी असणाऱ्या तंत्रज्ञावर, अटी शर्ती प्रमाणे खोल जमिनीत किमान तीन फूटावर गॅस पाईपलाईन टाकली आहे काय? हे जागेवर जाऊन पाहण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. शहरातील संपूर्ण रस्ते हे कोल्हापूर महापालिकेच्या मालकीचे आहेत. इतर कोणत्याही कंपन्यांना अगदी महावितरण कंपनीला सुद्धा काही कारणानिमित्त रस्त्याची खुदाई करावयाची असेल तर त्याची परवानगी महापालिका प्रशासनाकडून घ्यावी लागते.

खुदाई करून झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी कंपनीवर असेल तर ती त्यांनी पूर्ण क्षमतेने पार पाडली आहे काय हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेच्या प्रशासनावर येते. पाईपलाईन खुदाई करण्यासाठी महापालिकेचे जे प्रचलित दर आहेत त्या दराप्रमाणे संबंधित कंपनीकडून आधी पैसे भरून घेतले जातात. त्यामध्ये रस्ते पूर्ववत करण्याच्या खर्चाचे पैसे आधीच घेतले जातात.

विशेष म्हणजे भर पावसाळ्यात रस्त्यावर खुदाई करायची नाही. भर पावसाळ्यात पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने खुदाई करायची नाही असा नियम आहे. पण हा नियम धाब्यावर बसवून संबंधित गॅस पाईपलाईन कंपनीने भर पावसाळ्यात रस्त्यांची खुदाई करून बहुतांशी रस्ते अपघातासाठी निमंत्रण देणारे बनवले आहेत. आजही अनेक रस्त्यांवर विशेषतः उपनगरामध्ये अशा प्रकारच्या खुदाईमुळे संपूर्ण रस्ते चिखलमय झालेले आहेत.

एखाद्या कंपनीला रस्त्याच्या एका बाजूने खुदाई करण्याची परवानगी महापालिका प्रशासनाने दिल्यानंतर अटी शर्ती प्रमाणे खुदाई करण्यात आलेली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी महापालिका प्रशासना कडील विशेषता बांधकाम विभागाकडे अधिकाऱ्यांवर जबाबदारी असते. तथापि महापालिकेचा एकही कनिष्ठ अभियंता किंवा शहर उप अभियंता खुदाई करण्यात आलेल्या रस्त्यांकडे फिरकलेले आहेत असे घडलेले नाही. असे काही गुन्हे आहेत की पोलिसांना फिर्यादी बनावे लागते. गॅस पाईपलाईन दुर्घटनेची दखल पोलिसांना फिर्यादी होऊन घ्यावी लागते.

तथापि मनोरमा उपनगरात घडलेल्या गॅस पाईप लाईन दुर्घटनेत पोलिसांनी स्वतःच फिर्यादी बनवण्याची प्रक्रिया राबवलेली दिसत नाही. गुन्हा दाखल केल्यानंतरही या दुर्घटनेला जबाबदार कोण याची सखोल चौकशी करून जे जे कोणी जबाबदार आहेत त्या प्रत्येकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. दिनांक 25 ऑगस्ट पासून ते दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत मृत्यूशी दोन हात करणाऱ्या छोट्या प्रज्वलने मृत्यूला कवटाळल्यानंतर सर्वसामान्य माणूस हळहळला. एका सामान्य कुटुंबाची ही शोकांतिका हृदय पिळवटून टाकणारी आहे.

हेही वाचा :

तुम्ही पाहिला का? सलमान कुनिकाचा बोल्ड डान्स…Video Viral

सरकारचं टेन्शन वाढलं! ओबीसींचा महामोर्चा ‘या’ तारखेला मुंबईत धडकणार

ट्रेडिंगपूर्वी जाणून घ्या कोणत्या शेअर्सवर होणार परिणाम, आजचा बाजार कसा असणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *