मुंबईकरांसाठी पुढचे दोन दिवस अतिशय गंभीर ठरणार असल्याचा इशारा हवामान(Weather) विभागाने दिला आहे. मुंबईत काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी 48 तासांचा रेड अलर्ट जारी केला आहे.पालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी घरात शिरले असून रस्ते नद्यांमध्ये परिवर्तित झाले आहेत. शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नवी मुंबईसह मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. चुनाभट्टी रेल्वे स्टेशन, समर्थ नगर, भक्ती धाम रोड, भाजी मार्केट, स्वदेशी मिल भाग या परिसरांत पाण्याचा उपद्रव झाला आहे. अंधेरीतील वीरा देसाई रोडसह अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.ठाणे, बोरीवली, मिरा रोड, वसई परिसरातही पावसामुळे मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. रस्त्यांवरील खड्डे व पाणी यामुळे वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहनांना मदत केली जात असून अडकलेल्या रिक्षा आणि गाड्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
मुंबईसोबतच ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे(Weather). शेतकऱ्यांसाठी मात्र हा पाऊस दिलासादायक ठरत असून भात रोपांना उभारी मिळत आहे.मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सायन-माटुंगा दरम्यान लोकल थांबवण्यात आल्या असून प्रवासी पायी चालत दादरपर्यंत पोहोचताना दिसत आहेत.

महापालिका, आपत्ती व्यवस्थापन आणि वाहतूक विभाग सज्ज असून सतत काम सुरू आहे. रस्त्यांवरील पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होऊ नयेत यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः प्रवासी वर्ग व कामगारांनी प्रवास टाळावा आणि सुरक्षित स्थळीच थांबावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
प्रेम आंधळं खरंच! AIवर फिदा होऊन पतीने मागितला घटस्फोट
अतिवृष्टीने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांची तातडीच्या मदतीची मागणी
गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा, खांदेकरांना पुढे सरकण्यासाठी दोरखंड बांधला