काल प्रदर्शित झालेल्या धुरंधर : द रिव्हेंज या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये संमिश्र (mixed reactions) प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. चित्रपटाचा हा दुसरा भाग असून, कथानक, सादरीकरण आणि तांत्रिक बाबींमध्ये पहिल्या भागाशी मोठ्या प्रमाणात साधर्म्य असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवीन काही अनुभव देण्यात चित्रपट कमी पडल्याचं मत अनेक प्रेक्षक व्यक्त करत आहेत.पहिल्या भागात अक्षय खन्ना यांच्या व्यक्तिरेखेभोवती फिरणारी कथा या वेळी रणवीर सिंह यांच्या भूमिकेकडे वळलेली आहे. जसकिरत सिंह रांगी ते हमजा अली मजारी हा प्रवास रणवीर सिंह यांनी प्रभावीपणे साकारला असून, त्यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली जात आहे. पहिल्या भागात तुलनेने कमी प्रभावी वाटलेला त्यांचा अभिनय या वेळी अधिक ठळकपणे समोर आला आहे.

चित्रपटात अर्जुन रामपाल यांनी मेजर इकबालची भूमिका साकारली असून, त्यांचा आणि रणवीर सिंह यांच्यातील सामना हा चित्रपटातील महत्त्वाचा ठरतो. तसेच आर. माधवन आणि राकेश बेदी यांनी त्यांच्या भूमिका समाधानकारक पद्धतीने साकारल्या आहेत. संजय दत्त यांचा अभिनय नेहमीप्रमाणेच सरासरी राहिल्याचं मत व्यक्त केलं जात आहे, तर सारा अर्जुन यांना चित्रपटात फारशी संधी मिळालेली नाही.तांत्रिक बाबींविषयी बोलायचं झाल्यास, पहिल्या भागातील दमदार सिनेमॅटोग्राफीच्या तुलनेत या भागात नवीन काही पाहायला मिळत नसल्याचं जाणवतं. एडिटिंग वेगवान असलं तरी जवळपास चार तासांच्या लांबीमुळे चित्रपट काही ठिकाणी कंटाळवाणा वाटू शकतो, अशी प्रतिक्रिया आहे.
चित्रपटातील संवादांमध्ये शिव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याने काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. थिएटरमध्ये कुटुंबासोबत चित्रपट पाहताना अशा प्रकारच्या संवादांमुळे अस्वस्थता निर्माण होत असल्याचं मत मांडलं जात आहे.दरम्यान, चित्रपटातील काही दृश्यांमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका प्रसंगात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा संदर्भ देत त्याला काल्पनिक कथेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटात दाखवलेले काही संकेत आणि त्यातून उभे राहणारे प्रश्न यामुळे ‘नॅरेटिव्ह’ तयार करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू आहे.एकूणच, धुरंधर : द रिव्हेंज हा चित्रपट पूर्णपणे अपयशी नसला तरी पहिल्या भागाच्या तुलनेत कमी प्रभावी ठरत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
हेही वाचा :
6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज